
जुगाराच्या बादशहावर येत आहे सीरिज…
बॉलिवूड आणि ओटीटी प्रेमींसाठी एक खास बातमी आहे. अभिनेता विजय वर्मा याची मुख्य भूमिका असलेली बहुप्रतीक्षित वेब सीरिज “मटका किंग” ची शूटिंग 24 एप्रिल 2025 रोजी पूर्ण झाली आहे.
ही सीरिज 1960 च्या दशकातील मुंबईतील मटका जुगाराच्या जगावर आधारित असून प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ती दिग्दर्शित केली आहे.
मटका जुगाराचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे रतन खत्री यांच्या जीवनावर ही कथा प्रेरित आहे. रतन खत्रीने एका नव्या जुगाराच्या खेळाला जन्म देऊन संपूर्ण मुंबईत खळबळ माजवली होती. या सीरिजमध्ये विजय वर्मासोबत अभिनेत्री कृतिका कामरा,सई ताम्हणकर, गुलशन ग्रोव्हर आणि सिद्धार्थ जाधव हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणारी ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सीरिजची शूटिंग पूर्ण
24 एप्रिल 2025 रोजी “मटका किंग” ची शूटिंग पूर्ण झाली असून विजय वर्माने ही आनंदाची बातमी आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने एक खास मटका-आकाराचा केक दाखवला आहे, जो शूटिंगच्या समारोपानिमित्त बनवण्यात आला होता. शूटिंग संपल्यानंतर संपूर्ण टीमने एकत्रितपणे हा आनंद साजरा केला, जिथे सर्वजण उत्साहात आणि आनंदात सहभागी झाले होते. या सेलिब्रेशनमध्ये विजय वर्मा आणि कृतिका कामरा यांच्यासह संपूर्ण कास्ट आणि क्रू उपस्थित होते. या सेलिब्रेशनमधून संपूर्ण टीमने एकत्रितपणे केलेल्या मेहनतीचा आणि उत्साहाचा प्रत्यय आला.
कोण होते रतन खत्री ?
“मटका किंग” ही वेब सीरिज 1960 ते 1990 या कालावधीतील मुंबईतील मटका जुगाराच्या जगाची कथा सांगते. ही कथा एका कापूस व्यापाऱ्याभोवती फिरते, जो सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवण्यासाठी मटका नावाचा एक नवा जुगार खेळ सुरू करतो. हा खेळ संपूर्ण मुंबईत झपाट्याने पसरतो आणि श्रीमंतांसाठी राखीव असलेला हा जुगार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे सामाजिक समीकरणे बदलतात. ही कथा मटका जुगाराचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रतन खत्री यांच्या जीवनावर प्रेरित आहे.
खत्री हे एका सिंधी कुटुंबातील होते. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर खत्री पाकिस्तानातून भारतात आले. त्याच्या आयुष्यात नंतर तो मटका किंग म्हणून ओळखला जाऊ लागला. खत्रीने 1960 च्या दशकात या खेळाला लोकप्रियता मिळवून दिली. रतन खत्री यांनी मटका जुगाराच्या माध्यमातून एक साम्राज्य उभे केले, ज्यामुळे ते एका सामान्य व्यक्तीपासून जुगाराच्या जगातील बादशहा बनले.
खत्रीने देशात अनेक दशके चालणारे जुगाराचे जाळे स्थापन केले होते. सुरुवातीच्या काळात रतन खत्री यांनी वरळी येथील मटकासाठी प्रसिद्ध असलेल्या कल्याणजी भगत यांच्यासाठी काम केले. त्यावेळी कल्याणजी भगत यांना मटका किंग म्हटले जात होते. त्यानंतर त्याने रतन मटकासोबत स्वतंत्र काम सुरू केले. जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि प्रमुख लोक त्याचे क्लायंट होते असे मानले जात होते. भारतातील आणीबाणीच्या काळात खत्रीला तुरुंगवास भोगावा लागला आहे. त्याने 19 महिने तुरुंगात घालवले. 1990 च्या दशकात तो सट्टेबाजी व्यवसायातून निवृत्त झाला. 2020 मध्ये त्याचे निधन झाले.
या सीरिजमध्ये 1960 च्या दशकातील मुंबईचे चित्रण करण्यात आलं आहे, जिथे गुन्हेगारी आणि जुगार यांचे एक जटिल विश्व होते. मटका हा एक नंबर-आधारित जुगार खेळ होता, ज्याने त्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. या खेळाने अनेकांना श्रीमंत केले, तर काहींना रस्त्यावर आणले. “मटका किंग” ही सीरिज या रोमांचक आणि धोकादायक जगाची झलक दाखवणार आहे, ज्यामध्ये गुन्हेगारी, नाट्य आणि भावनांचा समावेश असेल.
1990 च्या दशकात मुंबईत हा मटका खूप लोकप्रिय होता. ज्यामध्ये लोक एका मटक्यातून काढलेल्या नंबरवर सट्टा लावावा लागत असे. हा खेळ रतन खत्री यांनी लोकप्रिय केला, ज्यामुळे ते “मटका किंग” म्हणून ओळखले जाऊ लागले. या खेळाच्या लोकप्रियतेमुळे मुंबईतील गुन्हेगारी जगावरही मोठा प्रभाव पडला, ज्यामुळे पोलिस आणि सरकारने त्यावर बंदी घालावी लागली.