
सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
चला जाणून घेऊया, यामध्ये तुमचा समावेश आहे का.
लाडकी बहीण योजना मागील वर्षी जून महिन्यात सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये बँक खात्यात जमा केले जात आहेत. निवडणूक प्रचाराच्या काळात महायुतीने सरकारमध्ये आल्यावर हा भत्ता २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आले असले तरी २१०० रुपये देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.
दुसरीकडे, विरोधकांनी सरकारवर आरोप केला की, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार वाढत आहे आणि सरकार लवकरच ही योजना थांबवू शकते. तसेच, इतर योजनांचे पैसे या योजनेकडे वळवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्व चर्चांदरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीत बोलताना यावर खुलासा केला.
अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्राचा विकास थांबवला जाणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून चुकीच्या चर्चा केल्या जात आहेत. त्यांनी ठामपणे सांगितले की, ही योजना कोणत्याही परिस्थितीत थांबवली जाणार नाही.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना म्हणजे सरकारने महिलांना दिलेली भाऊबीज आणि रक्षाबंधनाची भेट आहे. त्यामुळे ही योजना कायम सुरू राहील. मात्र, अजित पवारांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, ज्या महिलांना आधीपासून इतर कोणत्या योजनांचा लाभ मिळत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराची परिस्थिती तपासली जाणार आहे.