
भारत सोडताना पाकिस्तानी लोकांना अश्रू अनावर; ६२७ जण मायदेशी परतले !
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लोकांना तात्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्तानी लोकांना तशा नोटीसा देखील पाठवण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५ दिवसांत अटारी वाघा सीमेवरून किमान ६२७ पाकिस्तानी लोकांनी भारत सोडून पाकिस्तान गाठले.
यामध्ये ९ डिप्लोमॅट आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सरकारने शॉर्ट टर्म व्हिसा धारकांना तात्काळ पाकिस्तान परतण्याचे आदेश जारी केले असून, याची अंतिम मुदत रविवारी संपली. मात्र, भारत सोडताना अनेक पाकिस्तानी भावनिक झाले.
भारत सोडताना काही पाकिस्तानी लोकांना अश्रू अनावर झाल्या. ‘जर आमचं काही चुकलं असेल, तर आम्हाला गोळ्या घाला. पण देशाबाहेर हाकलून लावू नका’, असं बालासोर जिल्ह्यातील ७२ वर्षीय रझिया सुलतानाने म्हटलंय. रझिया सुलतान या महिलेला भारत देश सोडण्याची नोटीस मिळाली होती. ती गेल्या ४ वर्षांपासून भारतात स्थायिक असून, ती किडनीच्या समस्येनं त्रस्त आहे. त्यांच्या कुटुंबाने सरकारकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे.
गुजरांवाला येथील मारियालाही भारत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मारियाचे लग्न मसीहशी २०२४ साली झाले होते. तिला शॉर्ट टर्म व्हिसा मिळालेला होता. नोटीस मिळाल्यानंतर भारत सरकारकडे विनंती केली. तसेच ‘मला माझ्या पतीला कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही’, असं मारिया म्हणाली.
पाकिस्तानमधून आतापर्यंत ७५३ लोक सीमेवरून परतले आहेत. यामध्ये १४ डिप्लोमॅट तसेच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत छोडो नोटीस पाठवली होती. त्यानंतर अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानी मोठ्या संख्येनं भारत देश सोडून पाकिस्तानात परतले. रविवारीही किमान २३७ लोकांनी भारताची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला.