
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख हत्या आणि खंडणीप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडसह ७ जणांना पोलिसांनी अटकही केली आहे.
त्यातच, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री धनजंय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. दोषारोपपत्र दाखल होताच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यामुळे, इच्छा नसतानाही मुंडेंनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्यापही मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या नावाची पाटी झळकत आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी कायम ठेवण्यामागे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा देऊन आता जवळपास दोन महिने उलटले. मात्र, अद्यापही मंत्री म्हणून मंत्रालयातील धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी ‘जैसे थे’ ठेवलेली आहे. विशेष म्हणजे मंत्रालयात मंत्र्यांची अनेक कार्यालये जागा कमी असल्यामुळे विखुरलेली आहेत. मात्र, दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या नावाच्या पाटीसह दालन रिकामं ठेवण्यात आलेलं आहे. यावरुन मुंडेंना परत मंत्री करतील का? मुंडे परत मंत्री होतील का? असे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. एरव्ही मंत्री पदाचा राजीनामा झाल्यानंतर लगोलग नावाच्या पाट्या दालनाबाहेरुन काढल्या जातात. मात्र, इथे वेगळी भूमिका का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दरम्यान, धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण आजारी असल्या कारणाने, प्रकृती स्वास्थ्यासाठी राजीनामा देत आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळेही, त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याने त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देणे क्रमप्राप्त होते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर, याच कारणामुळे सातत्याने बीडमधील इतर लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय सातत्याने लावून धरला होता .