
पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आता पुणे विमानतळ सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी आली आहे.
तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान ते आज, सोमवारी भूषवणार आहेत. या बैठकीत विमानतळाच्या विविध प्रश्नांवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
नियमानुसार, विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्षपद हे शहराच्या विद्यमान खासदारांकडे असते. पुण्याचे (Pune) मावळते खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते.
मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर आता त्यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. तब्बल तीन वर्षांनी या बैठकीला मुहूर्त लागला आहे.
आज, सोमवारी सकाळी विमानतळ येथे होणाऱ्या या बैठकीत मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
बैठकीला समितीचे सदस्य, विमानतळ संचालक संतोष ढोके आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहतील. प्रवाशांच्या समस्या, नवीन विमानसेवा, धावपट्टीचा विस्तार आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे, ज्यामुळे विमानतळाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.