
इन्स्टाग्राम स्टोरीला केले शेअर…
अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या सिनेमाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचं शूटिंग सातारा जिल्ह्यात देखील करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच सिनेमाच काम सुरु असताना डान्सर कृष्णा नदीत बुडल्याची घटना समोर आली होती. मात्र, आता सिनेमाच्या कामाने पुन्हा एकदा जोर पकडलाय. या सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. शिवाय या सिनेमाचं दिग्दर्शन देखील रितेश स्वत: करत आहे.
राजा शिवाजी सिनेमाच्या लोगोसाठी 10 हजार मेल
दरम्यान, रितेश देशमुखने राजा शिवाजी सिनेमाच्या लोगोसाठी आवाहन केलं होतं. रितेशने आवाहन केल्यानंतर राजा शिवाजीच्या लोगोसाठी तुफान प्रतिसाद मिळालाय. या सिनेमाच्या लोगोसाठी 10 हजार लोगो ईमेल द्वारे पाठवण्यात आले आहेत. याबाबतची माहिती स्वत: रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली आहे. रितेशने याबाबतचे दोन व्हिडीओ देखील इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहेत. दरम्यान, यावेळी रितेश देशमुखचा नवा लूक देखील समोर आलाय.
रितेश देशमुखने मानले आभार
रितेश देशमुख म्हणाला, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आम्ही चित्रपट साकारतोय-‘राजा शिवाजी, या चित्रपटाचे लोगो डिज़ाइन करण्यासाठी आम्ही आवाहन केले होते. जवळपास 10,000 हून जास्त e-मेल्स आले. त्यातले काही डिझाईन्स मी पोस्ट करतोय. उस्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
अभिनेता विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारीत छावा या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर रितेशच्या राजा शिवाजी या सिनेमाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. आत्तापर्यंत रितेश देशमुखच्या लूकचे दोन फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे.