
साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या ‘भेंडवळ’ च्या भाकितांकडे साऱ्यांचे लक्ष;आज होणार मांडणी !
बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी घटमांडणीची परंपरा जोपासली जाते.
या ऐतिहासिक आणि मोठं संस्कृतिक महत्वअसलेल्या ही परंपरा शेतकऱ्यांसाठी बहु प्रतिक्षित पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी असून, संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ” भेंडवळची घटमांडणी ” दरम्यान, आज (30 एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे.
युद्ध होणार की नाही?’भेंडवळ’च्या भाकितांकडे साऱ्यांचे लक्ष
यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील,याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज घेणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांच , राजकीय नेत्यांच लक्ष लागलेल असतं. अशातच नुकताच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत असताना कुठल्याही परिस्थिती मध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजाला ही मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. युद्ध होणार की नाही? हे ही या भेंडवळच्या घट मांडणीत पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सायंकाळी 5.30 वाजता ही घट मांडणी होणार आहे व उद्या सकाळी सूर्योदयावेळी त्याचे अंदाज जाहीर करण्यात येणार आहेत.
घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का?
घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.
त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात- अंधश्रद्धा निर्मूलन समिती
दुसरीकडे, भेंडवळच्या घट मांडणीला अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने विरोध दर्शवला आहे. या अशा प्रकारच्या भाकिते व अंदाजानं कुठलाही शास्त्रीय आधार नसून गेल्या पाच वर्षात या अशा घटमांडणीचे कुठलेही अंदाज खरे ठरले नाहीत. त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा घट मांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी केलेल आहे.