
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
ठाणे,दि.01(जिमाका) :- जिल्ह्याने २०२७-२८ पर्यंत १५० बिलियन डॉलर चे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून त्यानुसार जिल्हा विकास आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, खाजगी भागधारक यांच्या समन्वयाने निश्चितच हे उद्दिष्ट गाठले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी नागपूर येथे व्यक्त केला.
दि. २६ व २७ जून २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, ‘मित्र’चे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक बँक सहाय्यित ‘MahaSTRIDE’ प्रकल्पाचा शुभारंभ आणि ‘प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस महसूल, नियोजन, उद्योग, पर्यटन, इ. विभागाचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, उप आयुक्त नियोजन, प्रादेशिक सहा संचालक उद्योग, महा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा कोषागार अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये सर्व जिल्ह्यांनी तयार केलेल्या जिल्हा विकास आराखड्याचे शासनाचे वरिष्ठ अधिकारी, जागतिक बँक प्रतिनिधी यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. विभागातील सर्वोत्कृष्ट जिल्ह्यांच्या सादरीकरणांमध्ये कोकण विभागातील ठाणे जिल्ह्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केले, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी असेही नमूद केले की, राज्य शासनाने महा-STRIDE, PM GatiShakti, Maitri २.०, Ease of Doing Business सुधारणा यासारख्या उपक्रमांद्वारे जिल्ह्यांच्या आणि राज्याच्या प्रगतीला गती दिली आहे. हे उद्दिष्ट साध्य झाल्यास, महाराष्ट्र भारतातील पहिले १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असणारे राज्य ठरेल आणि राष्ट्रीय आर्थिक विकासात मोठे योगदान देईल. महाराष्ट्राच्या विकासात ठाणे जिल्ह्याचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे.
महा-STRIDE (Strengthening Institutional Capabilities in Districts for Enabling Growth) हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश जिल्हास्तरावरील शासकीय यंत्रणांची क्षमता वाढविणे आणि डेटा-आधारित नियोजन व निर्णय प्रक्रियेला चालना देणे, हा आहे. यामध्ये जिल्हा विकास धोरणांचे प्रभावी अंमलबजावणी, खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे, तसेच जिल्ह्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी धोरणात्मक हस्तक्षेप समाविष्ट आहे. महा-STRIDE अंतर्गत, जिल्हा प्रशासनाला प्रशिक्षण, साधने आणि तांत्रिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे विकास कामांची गुणवत्ता व कार्यक्षमता वाढते.
महाराष्ट्र शासनाची मित्रा संस्था (Maharashtra Institute for transformation) व जागतिक बँक यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम राज्यातील समतोल आणि शाश्वत विकास साधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल शासनाने उचलले आहे.
यावेळी त्यांनी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचा आणि या विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ६ प्रादेशिक विभागांच्या प्रत्येकी १ अशा ६ विषयवार समित्यांचे अध्यक्ष व सदस्य यांना सन्मानित करण्यात आले. कोकण विभाग आयुक्त व समिती क्र.५ चे अध्यक्ष डॉ.विजय सूर्यवंशी आणि समितीचे सदस्य श्री. अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी ठाणे व इतर सदस्य यांचा यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.