
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे दि.०१ : “डाईन अँड डिव्हाइन” या पुस्तकात नमूद केलेली ‘चर्वण प्रक्रिया’ मला लाभदायक ठरली ती सर्वांसाठी आरोग्यवर्धक आहे असे प्रतिपादन सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांनी केले. आळंदी स्थित श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संचलित महायोगधामचे सद्गुरु ॲड. रामेश्वर सोमाणी लिखित “साधिता पोटोबा भेटतो विठोबा” या मराठी पुस्तकाच्या “डाईन अँड डिव्हाइन” या इंग्रजी प्रथम आवृत्तीचे प्रकाशन सिद्धी गार्डन येथे पवार यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पवार पुढे बोलताना म्हणाले, माझ्या जीवनात तीन पुस्तकांनी सकारात्मक बदल घडवून आणले त्यापैकी “डाईन अँड डिव्हाईन” हे एक पुस्तक आहे. उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाने सबब न सांगता दिवसभरात किमान एक तास व्यायामासाठी वेळ द्यायलाच हवा. जो स्वतःसाठी वेळ देतो तो इतरांसाठीही वेळ देऊ शकतो. तसेच आहार घेताना चर्वण प्रक्रियेसाठी वेळ काढणे स्वहिताचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी सदर पुस्तकाच्या ऑडिओ आवृत्तीचे प्रकाशन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते झाले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हे पुस्तक पोहचायला हवे. त्यामुळे युवा पिढीला शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग होईल. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ.अरुण भोकरे, डॉ.साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता कड यांनी केले तर पुस्तकाच्या सहसंपादक व प्रायोजक डॉ. प्रीती सागावकर यांनी आभार मानले. डॉ. शकुंतला काळे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, श्रीमती कांता सोमाणी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता कड, महायोगधामचे सचिव अमित तांबे, अक्षर सृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांचेसह भारती विद्यापीठाच्या वित्त व लेखा परीक्षण विभागाचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबई चे अध्यक्ष सीए बी.बी.कड, ज्ञानेश्वर तापकीर, रतनशेठ बालवडकर, अशोकराव मुरकुटे, सीए गोकुळ राठी, नंदाताई ताकवणे, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ.के.डी. जाधव , डॉ.एम.एस.सगरे, विजयराव कोलते, बुलढाणा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, योगिनी पोकळे, डॉ.मुकुंद तापकीर, प्रल्हाद राठी आदी मान्यवर उपस्थित होते.