
यं १० जुलै रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमेचा अपूर्व योग येत आहे. त्यादिवशी आपले गुरु, तसेच दत्त गुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांचे दर्शन, पूजन सर्वत्र केले जाते, पण शास्त्राला अभिप्रेत असलेले तीन गुरु विस्मरणात जाऊ नये यासाठी सविस्तर माहिती वाचा.
गुरुजी पूजा करताना आचमन करत पळीने तळहातावर पाणी घेत प्राशन करायला सांगतात. तेव्हा सुरुवातील `मातृ देवो भव’ मग `पितृ देवो भव’ नंतर ‘आचार्य देवो भव’ असे म्हणायला सांगतात. त्यानुसार आई वडिलांनंतर आपल्या संस्कृतीने गुरुंना तिसरे स्थान का दिले आहे ते जाणून घेऊ. या प्रश्नाचे उत्तर एका श्लोकात दडले आहे आणि तो श्लोक बालपणापासून आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे.
गुरुब्र्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:
गुरु ब्रह्मात पहावे, विष्णूत पहावे, महेश्वरात पहावे किंवा त्रिदेव गुरुंमध्ये पहावेत. कारण माता, पिता यांच्यानंतर देवस्थान कोण घेऊ शकत असतील तर ते म्हणजे गुरु.
गुरु हे आपल्या आयुष्याला आकार देतात. मार्गदर्शन करतात आणि योग्य अयोग्याची समज देतात. गुरु हे महेश्वराच्या परंपरेतील असल्यामुळे त्यांना विषयांची आसक्ती नसते. ते संसार तापातून मुक्त होऊन परमार्थाकडे आपले मन वळवतात, म्हणून ते श्रेष्ठ असतात.
प्रत्येक साधकाने त्रिदेवांचे स्थान जिथे एकवटले आहे त्या गुरु दत्तात्रेयांना शरण गेले पाहिजे. गुरु साक्षात परब्रह्म असतात. त्यांना शरण गेल्यावर देवाच्या शोधार्थ अन्य कुठेही धाव घेण्याची गरजच उरणार नाही.
गुरु कल्पवृक्षाप्रमाणे असतात. त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्यावर सांसारिक गोष्टींचे आकर्षण राहत नाही. आपल्या जीवनाचा उद्धार करण्याची क्षमता केवळ गुरुंकडे असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाची वाटचाल केली असता कधीही वाईट घडत नाही. आपले सगळे कार्य त्यांच्या पायाशी अर्पण करून `तस्मै श्री गुरवे नम:’ असे म्हणत जे जे मी करीन, जे जे माझ्या ठीकाणी असेल ते त्यांना अर्पण करेन, हा सच्चा भाव शिष्याजवळ असेल, तर गुरु त्याचा नक्कीच उद्धार करतात. अशा गुरुंचे आशीर्वाद लाभावेत, म्हणून देवाची पूजा करताना, देव भेटला नाही तरी या तिघांमध्ये देव पहा, असे सांगत आपली संस्कृती म्हणते मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव!
१० जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त आपली पहिली गुरु आई, दुसरे गुरु वडील, तिसरे गुरु शालेय शिक्षक, कला शिक्षक किंवा अन्य विषयातील शिक्षक, तसेच ग्रंथ, अनुभव, तंत्रज्ञान अशा गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका!