
पुण्यात केली मोठी घोषणा; नोकरी करणाऱ्यांना…
भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून धर्मांतराच्या विषयावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मांतर विरोधात पुण्यात मोर्चा काढण्यात आला.
यावेळी पडळकर यांनी उपस्थिती लावली. तसेच आगामी काळामध्ये या धर्मांतर विरोधात आपण नवीन मोहीम होती घेणार असल्याचे संकेत दिले.
माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले, आज पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. सांगलीमधील ऋतुजा नावाच्या हिंदू कुटुंबातील मुलीचं फसवून धर्मांतर झालेल्या ख्रिश्चन समाजातील मुलाशी लग्न लावण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच तिच्या पोटातील मुलावर देखील ख्रिश्चन पद्धतीने गर्भसंस्कार व्हावेत असा दबाव टाकल्यानंतर तिने गर्भातील सात महिन्याच्या मुलासहित आत्महत्या केली.
त्यामुळे तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सगळ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच आणखी असे धर्मांतराचे प्रकार घडू नये म्हणून कठोर असा धर्मांतर बंदी आणि लव जिहाद या बाबतचा कायदा महाराष्ट्र सरकारने आणावा अशी आमची मागणी आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार जर एखाद्या हिंदू कुटुंबातील व्यक्तीने आपल्या जातीच्या दाखल्याच्या आधारे नोकरी मिळवली असेल आणि त्यानंतर त्याने धर्मांतर केला असेल तर त्याला बडतर्फ करण्यात यावं असा निर्णय देण्यात आला आहे.
त्यामुळे ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या दाखल्यावरील हिंदू आणि त्याच्या पुढील पोट जात फोडून टाकावी. एकीकडे आरक्षणाचा लाभ घेऊन दुसरीकडे आम्ही ख्रिश्चन आहोत हे सांगत असाल तर ते अत्यंत चुकीचा आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी माझ्या विरोधात मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये उपस्थित असलेल्यांची यादी आता तयार करायला घेतली आहे. त्यातील किती अधिकारी आहेत हे तपासणार असून किती जणांनी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवली आहे आणि त्यानंतर त्यांनी धर्म बदलला आहे. त्याबाबतचे पुरावे गोळा करण्याची मोहीम आता हाती घेणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितला.
तसेच जे मोर्चे ख्रिश्चन धर्मियांकडून काढण्यात आले. त्या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा वापर करण्यात आला. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पष्ट मत होतं की मिशनरी आणि मुस्लिम भारतात धर्मांतर करू पाहत आहेत. या धर्मांतराला त्यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी ख्रिश्चन धर्म न स्वीकारतात बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे जे बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन या मोर्चामध्ये जात आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकर समजलेच नाहीत. त्यामुळे आधी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं, असं पडळकर म्हणाले.