
शिलेदारांना खास मिशन अन् इनकमिंगही…
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यासाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाच्या हिशोबानेच काही डावपेच टाकण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त बस्तान बसवण्यासाठी भाजपने वेगळी स्ट्रॅटेजी आखली आहे. याचा प्रत्यय पुण्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून येत आहे. निवडणुका एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याबाबत अजून स्पष्टता नाही. पण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे इतकं मात्र नक्की.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वाधिक पाच आमदार आहेत. शिंदे गटाचे दोन, ठाकरे गट आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार आहे. आता जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असतानाही भाजपने धक्का देण्याची तयारी चालवली आहे हे विशेष.
भाजपमधून जे सोडून गेले आहेत त्यांच्या अडचणीत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी एक टीमच काम करत आहे. याची जबाबदारी भाजप आमदार राहुल कुल यांना देण्यात आल्याचे समजते. आगामी निवडणुकीत पुणे जिल्हा परिषद ताब्यात घ्यायचीच असे नियोजन पक्षाच्या वरिष्ठांकडून केले जात आहे. ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करायचा असेल फोडाफोडीच्या राजकारणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपने या अँगलनेही तयारी चालवल्याची माहिती आहे.
मध्यंतरी राज्याच्या राजकारणात ज्या घटना घडल्या त्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांना पुन्हा ताकद देण्यासाठी भाजपने जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांना विशेष जबाबदारी दिली आहे. त्यांनीही कामाला सुरुवात केली असून नाराजांची चाचपणी केली जात आहे.