
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले…
अडीच वर्षात ज्यांनी शिक्षकांना फुटकी कवडी दिली नाही, ते शिक्षण संस्थांच्या अनुदानावर राजकारण करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.
विधिमंडळात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनातअनुदानित शिक्षकांचा प्रश्न मांडला. यावरून महाविकास आघाडी जास्त लावताना मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis) म्हणाले, शिक्षकांच्या अनुदानाचा मुद्दा मांडताना एक बोट आमच्याकडे आहे आणि चार बोटे तुमच्याकडे आहेत. या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली. कायम विनाअनुदानित म्हणून ही मान्यता दिली. त्यानंतर कायम शब्द तुम्हीच काढला. त्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाहीत. अनुदानाचा एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही. मी मुख्यमंत्री असताना पहिला टप्पा दिला. चाळीस टक्क्यांचा दुसरा टप्पा ही आम्हीच दिला. मध्यंतरीचा काळात अडीच वर्षे तुमचे सरकार होते. त्या सरकारच्या काळात तुम्ही शिक्षकांना फुटकी कवडी दिली नाही.
पुन्हा आमचे सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतला. आम्हाला पैसे द्यायला उशीर झाला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही ते पैसे देणार आहोत. आमचे वचन आहे. आम्ही त्यांना चर्चेसाठी बोलवू. पण ज्या पद्धतीने तुमचे लोक तेथे राजकारण करत आहेत. माझा तुम्हाला सवाल आहे की ज्या ज्या वेळी तुम्हाला संधी मिळाली तुम्ही फुटकी कवडी दिली नाही. आता जाऊन राजकारण करता?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले हे मुद्दे राजकारणाचे नाहीत. या मुद्द्यावर सरकार सकारात्मक आहे. सरकार चर्चा करेल योग्य निर्णय घेईल. पण कोणी राजकारण करत असेल तर ते योग्य नाही. शिक्षकांना पूर्ण अधिकार आहेत की त्यांनी त्यांच्या मागण्या मांडायला पाहिजेत. पण जर ते पक्ष राजकारण करत असतील तर हे मान्य होणार नाही. मी गृहमंत्री आहे. काय चालले आहे ते मला समजते. काही लोकांनी चूक केली म्हणून इतरांना त्रास देणारे आम्ही नाही.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज सरकारनचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट दिली आणि सरकारतर्फे सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा केली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या खात्यात पगार जमा होईल. आणि यापुढे तुमच्या पगाराची तारीख पुढे सरकणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने शासकीय अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील विधानमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना संबोधित करताना गिरीश महाजन म्हणाले की, आमची भूमिका सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामान्य कुटुंबातील आहात. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी अतिशय धाडसी निर्णय घेतला होता. त्यानुसार, तुम्हाला 20 टक्के, 40 टक्के आणि त्यानंतर 60 टक्के देण्यात आले होते. मात्र त्यानंतर सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झाला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, तुम्ही याबाबत वारंवार मागणी करत होता. पण आता तुमचा पगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं आहे की, आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचा आहे. पण येत्या दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊन येत्या १८ तारखेला अधिवेशन संपणार आहे. त्यावेळी तुमच्या खात्यात पैसे पडलेले असतील. यात कोणताही बदल होणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा शब्द दिला आहे की, काहीही करेन पण तुमच्या खात्यात केवळ एका महिन्यापुरता नाही, तर शेवटपर्यंत नियमितपणे पगार मिळेल. त्यामुळे ठरलेल्या टप्प्याप्रमाणे जो काही तुमचा पगार असेल, तो तुमच्या खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.
दरम्यान, राज्यामध्ये सध्या 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक व 3,040 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक व 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.