
पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे मुळा धरणात सातत्याने पाण्याची आवक सुरू असून, बुधवारी (दि. 9) धरणाचा साठा 18 टीएमसीपेक्षा जास्त झाल्याने सायंकाळी धरणातून मुळा नदीत विसर्ग सोडण्यात आला.
मुळा पाटबंधारे प्रशासनाने कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या आदेशान्वये धरणालगतच्या गावांना सायरनद्वारे सतर्कतेचा इशारा देत सायंकाळी 5 वाजता धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले. तीन हजार क्यूसेक वेगाने पाणी नदीतून जायकवाडी धरणाकडे झेपावले. धरणातून नदीतच झेपावणारे पाण्याचे दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
मुळा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये यंदा अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाच्या कृपेने मोठ्या प्रमाणात वाढ झाली. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात धरणाचा साठा 18 टीएमसीच्या पुढे गेला. मान्सूनपूर्वी धरणामध्ये 8900 दशलक्ष घनफूट इतका समाधानकारक पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर मान्सून काळात एकूण 9188 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने जमा झाले. शासकीय जलाशय परिचलन आदेशानुसार 1 ते 15 जुलैपर्यंत धरणसाठा 18 हजार 161 दशलक्ष घनफूट पाणीसाठा नियंत्रित राखणे गरजेचे आहे. त्यानुसार हा टप्पा गाठताच बुधवारी (दि. 9 जुलै) धरणातून पाणी सोडण्याचा आदेश झाला. त्यापूर्वी नदीलगतच्या गावांना, तसेच राहुरी नगरपरिषद हद्दीमध्ये दवंडीद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, धरणातून पाणी सोडले जात असताना धरणाकडे 5327 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. धरणाचे सर्व 11 दरवाजे 6 इंच वर उचलण्यात आले आहेत. प्रत्येक दरवाज्यातून 272 क्यूसेक असे एकूण तीन हजार क्यूसेकने पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे. 15 जुलैपर्यंत 18 हजार 161 दशलक्ष घनफूट साठा ठेवत उर्वरित पाणी कमी-जास्त प्रमाणात नदीत सोडले जाणार आहे.
पाणी सोडताना कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे, कनिष्ठ अभियंता घोरपडे, सलीम शेख व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड परिसरात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणाकडे होणारी आवक कमी जास्त प्रमाणात होत आहे. दिवसभर आवकेत घट होत असताना सायंकाळच्या आकडेवारीमध्ये आवक किंचित वाढली. सायंकाळी 5327 क्यूसेक आवक होत होती.