
एकनाथ शिंदेंच्या आमदाराचं टेन्शन वाढलं…
विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा महागात पडणार आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समितीचे अध्यक्ष, शिवसेनेचे आमदार आमदार अर्जुन खोतकर यामध्ये अडकण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात न्यायालयाने गुरुवारी कलाटणी देणारा निर्णय दिला.
विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि बारा आमदारांचा धुळे दौरा नुकताच झाला होता. या दौऱ्यात खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील यांच्या विश्रामगृहातील कक्षात १.८४ कोटी रुपये आढळले होते. ही रक्कम आमदार खोतकर आणि समितीच्या सदस्यांना वाटण्यासाठी गोळा केली होती, असा आरोप आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी याबाबत स्टिंग ऑपरेशन केले. खोली बाहेर ठिय्या देत आठ ते दहा तास राज्यातील सर्व यंत्रणांना माहिती कळवली. पोलीस याबाबत सारवासारव आणि प्रकरण दडपण्यात व्यग्र झाली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी गेल्या दोन महिन्यात कुठलाच ठोस तपास केला नाही, असे आढळले आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात अशी कोणतीच एसआयटी अस्तित्वात नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पडद्यामागून सूत्रे हलवल्याचे बोलले जाते. राज्य सरकारची यंत्रणा हे प्रकरण दडपण्यात सक्रिय असल्याचा आरोप होत होता. या सगळ्यांना माजी आमदार अनिल गोटे एकटे पुरून उरले आहेत.
धुळे पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्या विरोधात आमदार गोटे यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी होऊन या प्रकरणात खंडणीसह अन्य गंभीर कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. या आदेशामुळे पोलीस आणि सरकारी प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास केला नाही, असा दावा गोटे यांनी केला आहे. खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील आणि उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांनी हॉटेललात जेवण घेतले. मात्र त्याचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. अन्य सीसीटीव्ही फुटेज बाबत देखील पोलिसांनी अशीच बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे झाला नसल्याचा दावा गोटे यांनी न्यायालयात केला होता.
या प्रकरणात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर आणि सबंध राज्य शासन अडचणीत आले आहे. विधीमंडळ अंदाज समिती आणि त्याचे कामकाज हा देखील चर्चेचा विषय आहे. प्रकरणात धुळे जिल्ह्यातून समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांना देण्यासाठी 15 कोटी रुपयांची खंडणी जमा केल्याचा दावा केला जात आहे.
याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळाचे अधिकारी अनिल पाटील यांना यापूर्वीच बडतर्फ केले आहे. आता या प्रकरणाची पाळेमुळे खोदल्यावर आमदार खोतकर यांच्यापर्यंत तपास जातो का याची उत्सुकता आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी शेवटपर्यंत लढा देत शासकीय यंत्रणेला झुकविण्यात यश मिळवले.