
पण शशी थरूर गेम फिरवणार…
‘केरळ व्होट वाईब सर्व्हे 2026’नुसार काँग्रेसच्या यूडीएफ आघाडीला केरळ विधानसभेत सत्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असून, शशी थरूर यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती मिळत आहे.
थरूर यांची भाजपप्रणीत भूमिका, मोदींचे कौतुक, पक्ष प्रचारात अनुपस्थिती आणि काँग्रेस नेतृत्वाशी तणाव यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
थरूर यांची लोकप्रियता काँग्रेससाठी संधी असली तरी, त्यांच्यावर दुर्लक्ष केल्यास भाजपकडे वळण्याचा धोका असून त्यामुळे पक्षाला केरळमध्ये फटका बसू शकतो.
मागील काही वर्षांत देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहुतेक ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे. हरियाणा, छत्तीसगढ आदी राज्यांमध्ये तर विविध सर्व्हेंचा कल काँग्रेसच्या बाजूने होता. पण निवडणुकीदरम्यान झालेल्या चुकांमुळे हातातोंडाशी आलेल्या विजयाचे रुपांतर पराभवात झाले. आता केरळमध्येही एका सर्व्हेत काँग्रेसला सत्ता मिळणार असल्याचा अंदाज आहे.
केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. ‘केरळ व्होट वाईब सर्व्हे 2026’ मध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला निवडणुकीत सर्वाधिक पसंती मिळेल, असा निष्कर्ष सर्व्हेमध्ये काढण्यात आला आहे. तर सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटच्या पराभवाचे संकेत मिळत आहेत.
आगामी निवडणुकीत भाजपलाही फारसे काही हाती लागणार नाही असे दिसते. पण सर्व्हेमध्ये सर्वाधिक आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसच्या खासदार शशी थरूर यांनी यूडीएफचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून सर्वाधिक पसंती मिळाली आहे. जवळपास 28 टक्क्यांहून अधिक लोकांनी त्यांच्या बाजूने कल दिला आहे. इथेच काँग्रेसची खरी सत्वपरीक्षा आहे.
शशी थरूर हे मागील बरेच दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या सरकारचे कौतुक करताना दिसत आहेत. काँग्रेसच्या भूमिकेविरोधात ते मत मांडत आहेत. त्यावरून पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे टीकाही केली जात आहे. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारातही ते दिसले नाहीत. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे.
अशा स्थितीत थरूर हे यूडीएफ म्हणजे काँग्रेसचे केरळमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व्हेमध्ये थरूर यांच्या बाजूने कल असला तरी काँग्रेस हायकमांडच्या मनातून ते केव्हाच उतरले आहेत. केरळमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांच्याबाबत नकारात्मक चर्चा आहे. परिणामी, आगामी निवडणुकीत थरूर यांची नेमकी भूमिका काय असणार, याबाबत संभ्रम वाढला आहे.
थरूर यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेही काँग्रेसला परवडणारे नाही. तसे झाल्यास राज्यात पक्षाला फटका बसण्याचीही भीती आहे. भाजपला नेमके तेच हवे आहे. त्यामुळे सातत्याने त्यांना गोंजारण्याचे काम सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर विदेशात गेलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दिले गेल्याची चर्चा होते. विशेष म्हणजे काँग्रेसने त्यांच्या नावाला विरोध केला होता.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमधील एका कार्यक्रमात स्टेजवर बसलेल्या थरूर यांच्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्याचवेळी थरूर हे मोदी आणि भाजपच्या अधिक जवळ गेल्याची चर्चा सुरू झाली होती. आगामी निवडणुकीच्या तोंडावर थरूर यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्यास त्याचा पक्षाला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण त्याचे मतांमध्ये कितपत रुपांतर होणार, याबाबत साशंकता आहे. थरूर यांची सर्व्हेतून समोर आलेली लोकप्रियता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते, हे मात्र निश्चित. काँग्रेसच्या मतांवर थोडाफार परिणाम झाला तरी सत्तेपासून दुरावण्याची भीती आहे. त्यामुळे अशी रिस्क पुन्हा काँग्रेस घेणार का, याचे उत्तर पुढील काही दिवसांतच मिळेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: केरळ विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कोणाला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे?
उत्तर: काँग्रेसच्या यूडीएफ आघाडीला सत्ता मिळण्याचा अंदाज ‘केरळ व्होट वाईब सर्व्हे 2026’मध्ये व्यक्त केला आहे.
प्रश्न: शशी थरूर यांना काय लोकप्रियता मिळाली आहे?
उत्तर: थरूर यांना सर्वेक्षणात यूडीएफचे मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक 28% पेक्षा अधिक लोकांनी पसंती दिली आहे.
प्रश्न: काँग्रेस नेतृत्वाचे थरूर यांच्याशी संबंध कसे आहेत?
उत्तर: काँग्रेसमध्ये त्यांच्या भाजपपुरस्कृत भूमिकेमुळे नाराजी असून त्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे.
प्रश्न: भाजप शशी थरूर यांच्याकडे कसे पाहते?
उत्तर: भाजप थरूर यांना गोंजारण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्याकडून काँग्रेसमध्ये फूट पडण्याची आशा ठेवतो.