
शिवसेना पक्ष अन् चिन्ह सुनावणीच्या निमित्ताने वकिलांशी चर्चा; राजनाथ सिंहांनाही भेटले…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी, आगामी निवडणुकांची तयारी, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा आणि विविध पक्षांतील मतभेद यामुळे राज्यातील राजकीय चित्र सतत बदलत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. अधिवेशन चालू असतानाच त्यांनी अचानक दिल्लीला रवाना होऊन विविध वरिष्ठ नेत्यांशी गुप्त बैठक घेतल्याने हा दौरा अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे.
सुनावणीच्या निमित्ताने वकिलांची गाठभेट
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह संबंधित सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या खटल्यातील वकिलांशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याची चर्चा रंगली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाची संघटना राष्ट्रीय स्तरावर विस्तारण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार, दिल्लीत विविध राज्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी शिंदेंची बैठक झाल्याचे समजते.
भाजप नेत्यांशी एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी
या दौऱ्यात शिंदेंनी भाजपच्या अनेक केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटो देखील समोर आला असून, त्यामुळे या भेटी केवळ सौजन्यपूर्ण नव्हत्या, तर आगामी राजकीय घडामोडींशी संबंधित होत्या, असा अंदाज वर्तवला जात आहे.
एकनाथ शिंदेंची अमित शाहांशी चर्चा
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर आणि सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे, महापालिका निवडणुका होईपर्यंत भाजप किंवा शिंदे गटातील कोणताही नेता वादग्रस्त किंवा भडक वक्तव्य करू नये, असा स्पष्ट सल्ला अमित शहा यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांनी अलीकडे केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेल्या वादांमुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. या पार्श्वभूमीवर, महायुतीमध्ये ‘एकसंधतेचा आणि शिस्तबद्धतेचा’ संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचे स्पष्ट निर्देश शाह यांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.