
संजय राऊत म्हणाले; ते दबाव आणतील पण…
वरळीतील मराठी अस्मिता मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवण्याची शक्यता निर्माण केली आहे.
त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर भाजप-शिंदे गटासाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती रोखण्यासाठी आता भाजपचे केंद्रीय नेते मैदानात उतरले का? अशी चर्चा रंगली आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ नये, यासाठी केंद्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रात प्रयत्न सुरू झाले आहेत का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ते प्रयत्न करतील, ते व्यूहरचना करतील, ते दबाव आणतील, अनेक गोष्टी ते करतील. हा त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण, लोकं उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत. परवा वरळीत झाले, काल मीरा-भाईंदरला झाले, राज्यात ठिकठिकाणी या ठिणग्या पडत आहेत. या आता कोणालाही विझवता येणार नाही. ही भीती महाराष्ट्रातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांना सतावत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप
संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्या पैशाचा अतोनात वापर होतोय हे खरं आहे. हजारो, लाखो कोटींची कामे जी ठेकेदारांना शिंदे यांनी दिलेली आहेत, त्याचे किकबॅक आधीच घेतलेले आहे. हा फार कळीचा मुद्दा आहे. निवडणुकीच्या आधी आणि नंतर साधारण 95 हजार कोटीचे कामे शिंदेंकडून कोणत्याही टेंडर शिवाय ठेकेदारांना आधीच वाटण्यात आली. त्यातली किकबॅक शेकडो, हजारो कोटी हे आधीच घेण्यात आले आहेत. हा एक अत्यंत गंभीर मुद्दा महाराष्ट्रात आणि दिल्लीत चर्चेला जात आहे. जरी या पैशाचा वाटप हे शिंदेंनी केले असले तरीदेखील आज असंख्य ठेकेदारांकडून हे पैसे घेतले गेले आहेत. ते कामे त्यांना मिळाले नाहीत. ते आता बोलायला लागले आहेत आणि त्या संदर्भात काही ठेकेदारांनी न्यायालयात जाण्याची तयारी केल्याची माहिती आहे, असा आरोप त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय.
अमित शाह शिंदेंचे वकील आहेत का?
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचे एक मुख्य कारण, असे देखील सांगितले जात आहे की, 14 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी आहे. त्यामुळे वकिलांशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मग अमित शाह हे त्यांचे वकील आहेत का? राजनाथ सिंह त्यांचे वकील आहेत का? नितीन गडकरी त्यांचे वकील आहेत का? हे वकिलांना भेटायला गेले असतील तर त्यांनी वकिलाला भेटायला पाहिजे. म्हणजे या लोकांच्या माध्यमातून ते न्यायालयावर दबाव आणू इच्छित आहेत का? त्यांच्या मनात कोणती भीती सतावत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.