
संजय शिरसाटांचा Video समोर येताच आदित्य ठाकरेंचा हल्ला…
राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत.
तर बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता यावरून ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की,गेले दोन-अडीच वर्ष 33 देशांमध्ये गद्दारीची नोंद घेण्यात आली. 50 खोके एकदम ओके, त्याच्यातील कदाचित एक आज खोका दिसला असेल. हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत. परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना दिसला. आज एक खोक्यांसोबत बसले आहेत. ते आता बदलून सांगतील की, तिथे महात्मा गांधी छापलेले बनियन होते, बाकी काही त्यात नव्हते. पण, स्पष्टपणे दिसत आहे. ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन बळकावण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे. पण, प्रश्न असा आहे की, या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंधे कारवाई करणार का? ते बिलकुल कारवाई करणार नाही. त्यांना आयटीची नोटीस आलेली आहे. ती खूप उशिरा आली आहे. पण, या आयटीच्या नोटीसीवर आता त्यांना क्लीन चीट मिळणार की खरोखर भाजप कारवाई करणार? हे बघावे लागेल, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आयटीची नोटीस आली तरी देखील ऐटीत फिरताय
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कालच त्यांना आयटीची नोटीस आली तरी देखील ते ऐटीत फिरत आहेत. काल कोणा-कोणाला नोटीस आल्या. कोण दिल्लीत गेले गुरुपौर्णिमा म्हणून? कोण भेटलं, कोण नाही भेटलं, याची यादी आपल्या सर्वांकडे आहे. पण, इतक्या निर्लज्जपणे हा कारभार चालला आहे. खरोखर मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करायची असेल तर हा व्हिडिओ पाहून ते काहीतरी पाऊल उचलतील, अशी आशा मी बाळगतो, असे त्यांनी यावेळी म्हटले.
संजय शिरसाटांची प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओवर संजय शिरसाट म्हणाले की, मी आत्ताच तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय तर माझं घर आहे. तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे. माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेले बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही. टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावा त्यांनी केलाय.