
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात दे धक्का; काँग्रेस आणि राष्ट्रवादीतूनही इन्कमिंग…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबवलीमध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील 200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना म्हटले की, हा शक्तीप्रवेश म्हणजे डोंबिवलीतील जनतेचा ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आहे आणि ही लाट भविष्यात आणखी प्रबळ होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील डोंबिवलीतील वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रवीण उर्फ पऊ साळवी, ग्राहक संरक्षण कक्ष उपशहर संघटक कैलास दिनकर सणस , काँग्रेसचे शिबू शेख यांच्यासह सुमारे 150 ते 200 कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
पलावात आमदारांनी घर घ्यावे
कल्याण शीळ रोडवरील नवीन पलावा पूल कामाच्या दर्जावरून अद्यापही गाजत आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे सतत पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात आहेत. यावरून आता आमदारांनी तिकडेच घर घ्यावे म्हणजे उठलं की लगेच जाता येईल असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी त्यांना टोला लगावला आहे.
कामातून उत्तर देऊ…
कल्याण शीळ रोडवरील नवीन पलावा पुलाचे उद्घाटन झाले तोच तासाभरात हा पूल बंद करण्यात आला. पुलावरील रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने दुचाकीस्वार घसरून काही अपघात झाले. पावसाने तर पुलावरील रस्त्याची दुरावस्थाच करून टाकली. यावरून विरोधकांनी म्हणजेच मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सत्ताधारी पक्षावर पुलाच्या कामावरून चांगलीच झोड उठवली आहे. यावर सत्ताधारी पक्षाचे आमदार मोरे यांनी विरोधकांना बोलायचे ते बोलू द्या, आमचे काम बोलेल असे उत्तर दिले आहे.