
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा आरक्षणासाठी २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहचण्याचा इशारा दिला आहे. गेल्या पंधरा दिवसात नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून भरुन दिले जात नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
सरकार आमचे ऐकत नसेल तर पहिल्या पेक्षा पाच पट जास्त लोक मुंबईला जातील असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांची भेट घेतली आहे. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की सर्व पक्षातील आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना आम्ही स्वतःहून फोन केले होते.आमचं गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तुमच्यापाशी मांडायचा आहे. त्यांच्याकडे आमचं गाऱ्हान सांगणं आमचं काम आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही जाऊन सांगा की मराठी आणि कुणबी एकच आहेत तो जीआर काढा असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
मागच्या पंधरा दिवसात नोंदी सापडलेले आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिल्या जात नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.हे सगळे जर ऐकत नसतील तर पहिल्यापेक्षा 29 ऑगस्टला पाच पट जास्त लोक मुंबईला जातील असा दावाही मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केला.आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन करून सांगितलेले आहे की तुमच्याकडे गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा तुमच्याकडे मांडायचा आहे. एकदा जर मी 29 ऑगस्टला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ज्याला आपण निवडून पुढे पाठवले. तोच आपल्या आरक्षणाबद्दल बोलत नाही. आता म्हणून आम्हीच आता मरु पण विजयच घेऊन येऊ, तसा मोकळ्या हाताने माघारी येणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. मराठ्यांना मी आता एकच आव्हान करतो की मतभेद आणि मनभेद असतील तर ते सोडून द्या, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी फक्त दोनच दिवस मुंबईला या असे आवाहनही मराठ्यांना जरांगे पाटील यांनी केले आहे.
तर … सळो की पळो करतो
यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर यांना सळो की पळो करतो असे सांगून ते पुढे म्हणाले की ज्या दिवशी आंतरवालीत राज्यव्यापी बैठक झाली, त्या दिवशी जागा सुद्धा पुरली नाही. आता मुंबईत लोक कसे येतील हे फक्त फडणवीस साहेबांनी बघावं. 29 ऑगस्टच्या आत तुम्ही आरक्षण देऊन टाका अन्यथा परिस्थिती हाता बाहेर जाईल त्यास जबाबदार तुम्ही राहाल असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मराठा विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडीटी थांबलेल्या
संजय शिरसाठ यांना सुद्धा माझं सांगणं आहे की राज्यभरातल्या मराठा विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडीटी थांबलेल्या आहेत, त्यामुळे विनाकारण तुम्ही मराठा समाजाचा रोष अंगावर ओढून घेऊ नका. तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या मुलांचे प्रवेश रद्द व्हायला लागले आहेत. हे काम शिरसाट साहेब तुमच्याकडून होऊ देऊ नका. अजून वेळ गेलेली नाही जर का तुमच्या विरोधात सर्व गेले तर कोणी वाचवणार नाही.
शिरसाठ यांचा मराठ्यांशी डबल गेम ?
संजय शिरसाट यांना मी या संदर्भात तीन वेळेस सांगितलं आणि त्यांनी देखील माझ्यासमोर तीनदा फोन केले होते परंतु काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की, ते तेवढ्यापुरतंच द्या म्हणतात आणि नंतर नाही म्हणतात. त्यामुळे संजय शिरसाठ हे मराठ्यांशी डबल गेम खेळतील असा मला वाटलं नव्हतं. या संपूर्ण प्रकरणात मला ते जबाबदार वाटत होते मात्र, तुम्ही प्रधान सचिवांना सूचना देऊन देखीलही जर आदेश निघत नसतील तर ते योग्य नाहीत असेही ते म्हणाले.