
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची राजधानी असलेल्या सिकंदराबाद/हैदराबादकडे जाण्यासाठी श्री हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरून दररोज, साप्ताहिक आणि धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्याची संख्या तब्बल २४ आहे.
तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला जाण्यासाठी केवळ चारच रेल्वे गाड्या आहेत. हा एवढा मोठा विरोधाभास असून महाराष्ट्रावर विशेषता मराठवाड्यातील मराठी भाषिक प्रवाशांवर मोठा अन्याय आहे. मात्र मराठवाड्यातील आमदार आणि खासदार यांना याबाबत काहीच देणे घेणे नाही असे वाटते.
त्यामुळे मराठी प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे निजामकाळापासून मराठवाड्यात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांना महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात मोठे योगदान असलेल्या उमरी तालुकाचा समावेश होता. कालांतराने निजामस्टेट खालसा झाल्यानंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने आंध्र प्रदेशातील हैदराबाद / सिकंदराबाद येथे दक्षिण मध्ये रेल्वे विभागाचे झोन उभारून या अंतर्गत अनेक डिव्हिजनची निर्मिती केली.
या विभागात तेलुगु भाषेतील अधिकारी मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विशेषतः मराठवाड्यावर रेल्वे सुविधा व प्रश्नांबाबत सतत अन्याय केला होता. हा अन्याय आज तागायत सुरूच आहे. पुणे, मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या खचाखच प्रवाशांनी भरून जातात. म्हणजे सर्वच रेल्वे गाड्यांना गर्दी असते. त्यातच रेल्वे विभागाचे उत्पन्नही वाढले आहे. मात्र हैदराबाद व सिकंदराबादकडे जाणाऱ्या अतिजलद रेल्वे गाड्या एका मागून एक धावत असतात. काही रेल्वे गाड्या रिकाम्याही असतात.
परंतु या गाड्यांना उमरी रेल्वे स्थानकावर थांबाच देण्यात आला नाही, रेल्वे विभागाने नांदेड येथे रेल्वेचे विभागीय कार्यालय थाटले. त्यात मराठवाड्यातील धर्माबाद उमरी शिवणगाव हा ५० किलोमीटरचा मराठी भाषिक लोहमार्ग कायमचा हैदराबाद रेल्वे विभागाशी जोडला गेला. या स्थानकावरून नवनिर्मित आंध्रप्रदेश आणि तेलंगणाची राजधानी हैदराबादकडे जलद गाड्यांना तालुका स्तरावर थांबा देण्यात आला नाही.
नांदेड रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाण्यासाठी मोजून चारच रेल्वे गाड्या आहेत. त्यात तपोवन, नंदिग्राम, देवगिरी, राज्यराणी या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. तर तेलंगणा आणि आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या सिकंदराबाद / हैदराबादकडे जाणाऱ्या रेल्वे जाड्यांची संख्या तब्बल २४ आहे. त्यात काही साप्ताहिक आणि विशेष रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
तेलंगणा आणि आंध्रप्रदेशकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्या हैदराबाद १७०१९, सिकंदराबाद एसी स्पेशल ०७००२, तिरुपती साप्ताहिक १७४१८, देवगिरी एक्सप्रेस १७०५७, हैदराबाद सुपरफास्ट १२७१९, हैदराबाद विशेष, काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस १७६४२, रायचूर १७६६४, काचौगुडा एक्सप्रेस १७६४०, अजंठ एक्सप्रेस १७०६३, काचीगुडा स्पेशल विशेष भाडे तत्त्वावर धावणारी काचीगुडा एक्सप्रेस ०७०१५, काचीगुडा एक्सप्रेस ०७०५४, रामेश्वरम एक्सप्रेस १७७३४, तिरुपती सुपरफास्ट विशेष ०४६०६, यशवंतपुर १६००४, विशाखापटनम २०८१२, नागावली ०७१८९, नरसापुर १७२३२, मेडचल ७७६०६, इंदोर एक्सप्रेस ०७१८९ आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.