
तमाशा कहते हो…
काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे सरकारने माध्यमांमध्ये केलेला तमाशा होता,’ असे विधान सोमवारी (ता. 28 जुलै) लोकसभेत बोलताना केला होता.
त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 29 जुलै) काँग्रेस पक्षाला सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये हिम्मत नसल्यामुळे ते अशी विधाने नवख्या सदस्यांकडून वदवून घेतात, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे.
संसदेत सोमवारपासून (ता. 28 जुलै) पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा सुरू आहे, त्या चर्चेत सहभागी झालेल्या सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून तर देशभक्तीचे वाटते. पण सरकारने माध्यमांमध्ये केलेला तो एक तमाशा होता,’ असे विधान केले होते. त्याला आज मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या एक नवख्या खासदार….त्यांना आपण माफ केलं पाहिजे; कारण नवख्या खासदारास काय म्हणायचे? पण काँग्रेसचे आका त्यांना लिहून देतात, त्यांच्याकडून वदवून घेतात. कारण, काँग्रेसच्या आकामध्ये हिम्मत नाही.
नवख्या सदस्यांकडून काँग्रेसचे आका वदवून घेतात की, ऑपेरशन सिंदूर हा तर तमाशा होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या २६ लोकांना मारलं, त्या भयंकर घटनेवर ॲसिड टाकण्यासारखे हे पाप आहे. तमाशा म्हणता. तुमची असहमती असू शकते. पण, काँग्रेस पक्षाचे लोक असं वदवून घेतात, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला.
डोनाल्ड ट्रम्प’बाबत काय म्हणाले?
भारत-पाकिस्तान युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर थांबविण्यात आले, असा आरोप होत आहे. त्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेला उत्तर देताना भाष्य केले आहे. ते म्हणाले, जगातील कोणत्याही नेत्यानं आमच्यावर ऑपरेशन सिंदूर थांबवविण्यासाठी दबाव टाकलेला नाही.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींसोबत काय बोलणं झालं होतं?
मोदी म्हणाले, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी मला 09 मे रोजीच्या रात्री फोन करायचा प्रयत्न करत होते. ते सुमारे तासभर प्रयत्न करत होते. पण, लष्करासोबतच्या बैठकीत व्यस्त होतो, त्यामुळे मी त्यांचा फोन घेऊ शकलो नाही. बैठक संपल्यानंतर त्यांना फोन केला असता, त्यांनी ‘पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे,’ असे मला सांगितले.
पाकिस्तान जर हल्ला करण्याच्या विचारात असेल तर त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. जर पाकिस्ताननं आमच्यावर हल्ला केला तर आम्हीही त्यांना जशास तसा उत्तर देऊ, असे मी त्यांना सांगितले होते, असे मोदी यांनी सांगितले.