
मध्यरात्री घरासमोर जमावाचा राडा !
पाकिस्तानशी १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धादरम्यान देशसेवा करणाऱ्या जवानाच्या कुटुंबीयांवर बांगलादेशी असल्याचा आरोप करण्यात आल्याची बाब पुण्यात घडली आहे. पुण्याच्या चंदननगर पसिरात २६ जुलै रोजी मध्यरात्री हा प्रकार घडल्याचं आता उघड झालं असून यामुळे संबंधित कुटुंबाला मोठा मनस्ताप झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आधी या कुटुंबालाच पोलीस स्थानकात नेल्याचीही बाब इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या सविस्तर वृत्तात नमूद करण्यात आली आहे. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.
नेमका प्रकार काय?
चंदननगरमध्ये शमशाद शेख व त्यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांचे काका हकिमुद्दीन शेख हे लष्करातून निवृत्त झाले असून कारगिल युद्धादरम्यान त्यांनी देशाच्या सीमेवर आपलं कर्तव्य बजावलं होतं. सध्या ते उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास आहेत. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील इतरही काही सदस्यांनी भारतीय लष्करात देशसेवा केली आहे. एकीकडे कुटुंबाच्या लष्करी पार्श्वभूमीमुळे आसपासच्या नागरिकांकडून आदरानं पाहिलं जात असताना दुसरीकडे २६ जुलैच्या मध्यरात्री शमशाद शेख यांना भयंकर अनुभव आला. ते बांगलादेशी असल्याचा आरोप करत तब्बल ६०-७० लोकांच्या जमावाने त्यांच्या घरात घुसून गोंधळ घातल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
शमशाद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तिथे सामान्य पोशाखात उपस्थित होते, मात्र त्यांनी हा प्रकार थांबवला नाही. मध्यरात्री पोलीस कुटुंबीयांना पोलीस स्थानकात घेऊन गेल्याचा दावाही शमशाद शेख यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता बांगलादेशी वास्तव्य करत असल्याच्या माहितीच्या आधारावर पोलीस तिथे तपास करत होते, अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी शेख यांच्या घरात मोठा जमाव घुसल्याच्या आरोपांचीही चौकशी केली जात असल्याचं पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
२६ जुलैला मध्यरात्री काय घडलं?
शमशाद शेख म्हणाले, “रात्री ११.३० ते १२ च्या सुमारास आमच्या घराच्या दरवाज्यावर काही लोक लाथा मारू लागले. दरवाजा उघडताच ते घरात शिरले आणि आमची ओळखपत्रे मागू लागले. ७ ते १० लोकांच्या गटाने हा जमाव घरात शिरला. त्यातले काही आमच्या बेडरूममध्येही गेले व त्यांनी घरातील महिला व मुलांना झोपेतून उठवलं. आम्ही त्यांना आमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्रही दाखवलं. पण हे सगळं खोटं असल्याचंच ते म्हणत राहिले.
त्यांनी आम्हाला पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि पोलीस स्थानकात नेलं. तिथे पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा पोलीस स्थानकात यायला सांगितलं, नाहीतर तुम्हाला बांगलादेशी जाहीर केलं जाईल, असं त्या म्हणाल्या, असा दावाही शेख यांनी कला. पोलीस निरीक्षक ढाकणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.