
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सावली रेस्टॉरंटवरून मंत्री योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सावली रेस्टॉरंट हा डान्सबार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच वाळूच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केला होता. त्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या, दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावतानाच अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान काही दिवसांपासून वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. यामध्ये योगेश कदम यांचं नाव देखील असल्याचं बोललं जातं होतं. मात्र कदम यांच्या राजीनाम्यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे, टीका करून काम बंद करता येत नाही, राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे, योगेश कदम यांनी चिंता करायचं काम नाही, असं शिंदे यांनी म्हटल्यानं या विषयाला सध्या पूर्णविराम मिळाला आहे.
मात्रा आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यामुळे कदम यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी योगेश कदम यांच्याबद्दल बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या मी बऱ्याच लोकांची माहिती काढत आहे, राज्यात वाईट पद्धतीने सरकार चालत आहे. योगेश कदम यांच्याबाबतही प्रचंड माहिती माझ्याकडे आलेली आहे, आता जर ती सगळी माहिती मी बाहेर काढली तर चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे मी न्यायालयीन लढा देणार आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता कदम यांच्या अडचणी वाढणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान भाजप नेत्यांची वाजवायला मला सगळ्यात जास्त आवडलं असतं, पण त्यांच्याकडे चांगली खाती नाहीयेत, सर्व चांगली खाती राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडे आहेत, त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांची प्रकरण बाहेर येत आहेत, असंही यावेळी दमानिया यांनी म्हटलं आहे.