
सभागृहात ‘नमस्ते सदा वत्सले; म्हणताच भाजप नेत्यांच्या आनंदाला उधाण…
कर्नाटक विधानसभेत एक धक्कादायक राजकीय दृष्य पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था मानली जाते. कॉंग्रेसकडून अनेकदा संघाचा कडाडून विरोध केला जातो.
मात्र कर्नाटकमध्ये उलटे चित्र दिसून आले. कॉंग्रेस नेते आणि कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सभागृहामध्ये ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही आरएसएस प्रार्थना गायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
कॉंग्रेस नेते आणि कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची आरएसएसची प्रार्थना तोंडपाठ आहे. त्यांनी भर सभागृहामध्ये ही प्रार्थना गायली. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून आरएसएसचे कौतुक केले तेव्हा हेच काँग्रेस कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे टीकाकारांमध्ये आघाडीवर होते. आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डीके शिवकुमार हे विधानसभेत संघ प्रार्थना गात असल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेत्याला ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही संपूर्ण संघ प्रार्थना कशी आठवते यावरही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर यावरुन चर्चांना उधाण आले आहे. नेटकरी प्रश्न उपस्थित करू लागले की हा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश आहे की भाजपमध्ये सामील होण्याचे संकेत आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कॉंग्रेस नेत्यांना देखील आरएसएसची प्रार्थना तोंडपाठ असल्याचे दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सभागृहातील भाजप आमदारांनी टेबल थापून शिवकुमार यांना पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी भाजप आमदारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
डीके शिवकुमार हे एकेकाळी RSSशी संबंधित
डीके शिवकुमार हे कर्नाटक विधानसभेत आरएसएस प्रार्थना गात होते, तेव्हा भाजप आमदारांनी आनंदाने टेबल वाजवायला सुरुवात केली. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची सभागृहात चर्चा सुरू होती. त्यानंतर डीके शिवकुमार यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान, सभागृहातील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी त्यांना आठवण करून दिली की तेही एकेकाळी आरएसएसशी संबंधित होते. हे स्वीकारत शिवकुमार म्हणाले की त्यांना अजूनही संघाची प्रार्थना आठवते. त्यानंतर त्यांनी प्रार्थना गायला सुरुवात केली. यावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी लिहिले की हा काँग्रेस हायकमांड आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना थेट इशारा आहे. लोकांचा असा विश्वास आहे की जर त्यांचे शब्द ऐकले नाहीत तर शिवकुमार भाजपचा मार्ग स्वीकारू शकतात. एका युजरने म्हटले की, ते असे सूचित करत आहेत की जर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर ते भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत का? असे राजकीय अंदाज नेटकऱ्यांनी लावण्यास सुरुवात केली आहे.