
सरकारी इंजिनिअरचा प्रताप पाहून पोलीसही चक्रावले; नेमकं काय प्रकरण ?
बिहार मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक सरकारी इंजिनिअर रात्रभर नोटा जाळत राहिला मात्र, तरीही त्याचा हा प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही, आणि अखेर त्याला पोलिसांनी नोटांसह रंगेहाथ अटक केली.
नेमकं हे प्रकरण काय? सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर एवढं का व्हायरल होत आहे? यामागची कहाणी काय आहे? आजच्या बातमीतून जाणून घेऊया…
बिहारमध्ये राहणार विनोद राय असं या सरकारी इंजिनिअर व्यक्तीचं नाव आहे. विनोद हा गुरुवारी रात्री सीतामढीहून मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन पटनाला निघाला होता. याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक त्याचा पाठलाग करत पटणामध्ये पोहोचलं. मात्र, त्याला ताब्यात घेण्याआधीच विनोदने सगळा पैसा त्याच्या निवासस्थानी नेला.
आणि आर्थिक गुन्हे शाखेचा छापा पडला तर आपल्याकडे असलेला काळा पैसा सापडेल या भीतीमुळे विनोदने पैसे जाळण्यास सुरुवात केली. यावेळी त्याची पत्नी घराच्या खाली येऊन थांबली. आणि जेव्हा गुन्हे शाखेचे पथक तिथे पोहचले तेव्हा तिने घरात एकटी असल्याचं सांगितलं. यामुळे छापा टाकण्यासाठी गुन्हे शाखेला सकाळ होण्याची वाट बघावी लागली. मात्र, एवढं करून देखील इंजिनिअरला रंगेहाथ पकडण्यात आले. सकाळ होताच गुन्हे शाखेचं पथक घरात गेलं आणि त्यांनी इंजिनिअरला ताब्यात घेतलं.
इंजिनिअर घरातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत रात्रभर नोटा जाळत बसला होता. त्यानं २ ते ३ कोटी रुपयांची रोकड रात्रभर जाळली होती. पण तरीही३९ लाख रुपये शिल्लक राहिले. ही रोकड पाण्याच्या टाकीत आढळून आली. तर छाप्यात घरातून साडे बारा लाखाच्या अर्धवट जळालेल्या नोटा आणि बाथरूमच्या पाईपमध्ये नोटांची जळालेली राख सापडली.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने विनोदसह त्याच्या पत्नीला नोट जाळल्या प्रकरणी आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक केली आहे. तसेच विनोदवर भ्रष्टाचार प्रकरणी वेगळा खटला चालवला जाईल.