दैनिक चालु वार्ता वार्ता उप संपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईच्या आदर्श मैदानावर भव्य आंदोलन होणार असून, यामध्ये तालुक्यातील आणि शहरातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सतत बैठकीद्वारे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मराठा युवक गावागावात जाऊन “आरक्षण का गरजेचे आहे” याविषयी जनजागृती करत आहेत. चावडी, कट्टा आणि मंदिर बैठका घेऊन समाजात एकात्मता व संघटन निर्माण केले जात आहे.
भूम तालुक्यातील सकल मराठा समाज याच धोरणानुसार तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बैठकांचे आयोजन करत आहे. या बैठकींना ग्रामीण भागातून भरघोस प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक गावातून मराठा बांधव मुंबई आंदोलनात सहभागी होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
ग्रामीण बैठका पूर्ण होत आल्याने आता भूम शहरातील मराठा बांधवांसाठी विशेष नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.२५ ऑगस्ट २०२५ रोजी वेळ: संध्याकाळी ८.०० वाजता, ठिकाण: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, न्यायालयासमोर, भूम येथे बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत मुंबई आंदोलनासाठी नियोजन, वाहतूक, संघटन, जबाबदाऱ्या आणि सहभागाची यादी निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी भूम शहरातील सर्व मराठा युवक, ज्येष्ठ, महिला आणि नेतृत्वाने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज, भूम यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक आंदोलनात भूम तालुक्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव मुंबईला जाणार असल्याचे ठाम संकेत मिळाले आहेत.