
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
तलासरी तालुक्यातील सूत्रकार लाखनपाडा परिसरातील खदानीमुळे ग्रामस्थांचे जीवन असुरक्षी अस्थिर झाले आहे. खदानीत होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना तडे जात असून, भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडत आहेत. यामुळे ग्रामस्थां मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नुकत्याच घडलेल्या घटनेत कोणतीही पूर्वसूचना न देता दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोठा स्फोट करण्यात आला. या स्फोटामुळे काही दगड थेट शेतांमध्ये पडल्याने उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, परिसरातील लोक भीतीग्रस्त झाले आहेत.या घटनेनंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात लेखी तक्रार देत खदानी तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे.प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली असूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
कोट
जर प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिलं नाही आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नन निर्माण झाला, तर त्याला शासन व प्रशासन जबाबदार राहील.
सुनील इभाड -डहाणू विधानसभा प्रमुख शिवसेना
कोट
दोन्ही पक्षांना आपले पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार कागदपत्रांची तपासणी करून पुढील चौकशी करण्यात येईल.
अमोल पाठक- तलासरी तहसीलदार
कोट
सदर खदान ही आमच्या मालकीच्या जागेवर कायदेशीररित्या सुरू आहे, याचे सर्व आवश्यक पुरावे आमच्याकडे आहेत. खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्याची माहिती आमच्या पर्यंत पोहोचली आहे. आम्ही याबाबत संवेदनशील आहोत आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास पूर्णपणे तयार आहोत.आमचा उद्देश कोणाच्याही जीवित वा मालमत्तेचं नुकसान करणं नाही, तर स्थानिक कायदे आणि समाजिक जबाबदारी पाळून व्यवसाय चालवणं हा आमचा प्राथमिक हेतू आहे.
सोमा लिलका – जागा मालक सुत्रकार लाखनपाडा
कोट-
आमच्या पाड्या शेजारील खदानीतील ब्लास्टिंगमुळे आमच्या घरांना तडे गेले असून जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही तक्रार केली आहे. कृपया सदर खदान तहसीलदार साहेबांनी कायमस्वरूपी बंद करण्याची तातडीने कार्यवाही करावी, ही विनंती.
सचिन पाटकर -शेतकरी सूत्रकार, लाखनपाडा