
गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुभेच्छा देतानाच पुन्हा एकदा आरपारच्या लढाईचा नारा दिला. मुंबईत शांततेत आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा करत त्यांनी मराठा बांधवांना संयम राखण्याचे आवाहन केले.
सकाळी साडेदहा वाजता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. “ही शेवटची लढाई आहे, डोक्याने जिंकायची आहे, कितीही दिवस लागले तरी मागे हटायचे नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जरांगे यांनी थेट केंद्र आणि राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हिंदू सणासुदीत अडवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला – हिंदूविरोधी काम कोण करतं याचं उत्तर द्यावं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत जरांगे म्हणाले, आमच्यावरचा अन्याय झाकण्यासाठी देव-देवतांना पुढे केलं जात आहे. इंग्रजांच्या काळातही उपोषण रोखलं गेलं नाही, पण हे सरकार मात्र तेच करत आहे.