
मुंबई महापालिकेत साडेतीन वर्षांपासून महापौर, सभापती, नगरसेवक नाहीत. महापालिका आयुक्तांच्या हातात सर्व कारभार एकवटला आहे. यामुळे रस्ते, ड्रेनेज, पाणी यासारख्या मुलभूत सेवासुविधांसाठी नागरिकांची कुचंबना होत आहे.
भांडूप पश्चिमच्या माजी नगरसेविका दीपमाला बढे यांनी त्यांच्या वॉर्डमधील ड्रेनज आणि सिवेजच्या समस्येविरोधात आवाज उठवला. नागरिकांना होणाऱ्या जीवघेण्या त्रासाची जाणीव प्रशासनाला करुन दिली. त्यानंतर भांडूप मधील डोंगरी भागातील सिवेज, ड्रेनेजसाठी पालिका प्रशासनाने रितसर कार्यवाही करत साधारण अडीच कोटी रुपये मंजूर केले. मात्र माजी नगरसेविका शिंदे गटाच्या नाहीत कळाल्यानंतर दिलेला निधी परत घेण्याची कार्यवाही करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही झाडझडती घेण्यात आल्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
भांडूप पश्चिम या भागातील डोंगराळ वस्तीत काही नागरिकांनी घरात संडास बांधले आहेत. मात्र या भागात सिवजे आणि ड्रेनेजची व्यवस्था नाही. वेळेवर स्वच्छता होत नसल्यामुळे सर्व घाण रस्त्यावर सोडण्याची वेळ येते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी कुचंबना आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र गेल्या साडेतीन वर्षांपासून महापालिका निवडणूक झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न पालिकेत मांडणार कोण, त्यांच्यासाठी लढणार कोण अशी समस्या निर्माण झाली आहे.
भांडूप पश्चिम या परिसरात ड्रेनेजची नितांत आवश्यकता असल्याचे येथील माजी नगरसेविका दीपमाला बढे यांनी वॉर्ड अधिकारी तसेच पालिका अधिकारी यांच्या लक्षात आणून दिले. दीपमाला बढे यांच्या पाठपुराव्यानंतर आणि या भागातील रहिवाशांची दुर्गंधी आणि घाणीमुळे होणारी कुंचबना लक्षात घेऊन वॉर्ड अधिकार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त यांनी पालिकेकडे सिवेज, ड्रेनेज सिस्टिमसाठी प्रस्ताव तयार करुन दिला. नागरिकांची मुलभूत गरज लक्षात घेऊन आणि दीपमाला बढे यांच्या पाठपुराव्यामुळे पालिकेने साधारण अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
भांडूप पश्चिममधील नागरी सुविधांसाठी निधी मंजूर झाल्यानंतर याभागातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही लोकांनी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करुन ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका दीपमाला बढे यांनी अडीच कोटी रुपये पालिकेकडून मंजूर करुन घेतल्याची माहिती त्यांना दिली.
तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दीपमाला बढे यांना पक्षप्रवेशासाठी संपर्क केला गेला होता. मात्र त्यांनी मातोश्रीसोबत असलेली निष्ठा कायम ठेवली. काही झाले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करणार नाही असा पवित्रा घेतला होता. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वॉर्डातील विकास कामासाठी नगरसेवक नसताना निधी मंजूर करुन घेतला, हे लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची वकृदृष्टी त्यांच्यावर पडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना तातडीने फोन करुन भांडूप येथील निधी वितरणावरुन त्यांची झाडाझडती घेतली. त्यांना अक्षरशः फैलावर घेतले असल्याची माहिती आहे. त्यानंतर पालिका आयुक्त गगराणी यांनी तडकाफडकी संबंधित विभागातील वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापनातील अधिकारी, वित्त विभागातील अधिकारी यांची कडक शब्दात ‘शाळा’ घेतली. एवढेच नाही तर भांडूप पश्चिम येथील सिवेज, ड्रेनेजसाठी मंजूर केलेला दोन कोटी 38 लाख रुपयांचा निधी परत घेण्याचे आदेश दिले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून विकासकामे करणाऱ्या अधिकारी आणि माजी नगरसेवकांबद्दलच्या या कारवाईने अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती आहे. डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मुलभूत सोई-सुविधेच्या कामातही राज्यकर्ते फक्त आपल्या पक्षाचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते नाहीत म्हणून राजकारण करणार असतील तर राजकारण आता आणखी कोणत्या थराला जाणार आहे.
मलनिस्सारण वाहिनी आणि ड्रेनेजसाठीचा निधी पालिकेने परत घेतल्याची माहिती मला आताच मिळाली आहे, असे असे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका दीपमाला बढे यांनी ‘माय महानगर’ला सांगितले. त्या म्हणाल्या की, मी एवढेच सांगू शकते की, ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. मी काही माझ्या घरासाठी निधी मागत नव्हते. माझ्या परिसरातील महिला, मुली, माता-भगिनींना होणारा त्रास मला पाहवत नव्हता. त्यांच्या घरातील शौच आता त्यांनी रस्त्यावर टाकयाचे का? असा संतप्त सवाल माजी नगरसेविका दीपमाला बढे यांनी केला. त्या म्हणाल्या की, मला शिंदे गटात प्रवेशासाठी मोठा दबाव टाकण्यात आला. मात्र मी जिथे आहे तिथे सुखी असल्याचे त्यांना सांगितले. माझ्या वॉर्डमधील विकासकामासाठी मंजूर झालेला निधी थांबवून ठेवण्यात आला होता. तो मी मंजूर करुन घेतला. आता त्यांनी तो परत घेतला असेल तर त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवावे की, देवाच्या काठीचा आवाज होत नसतो. अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.