दैनिक चालू वार्ता – रिसोड शहर प्रतिनिधी : विजय जुंजारे
राजमाता माँ जिजाऊ यांचे माहेरघर असलेले सिंदखेडराजा हे केवळ ऐतिहासिक स्थळ नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी प्रेरणा स्थान, स्वाभिमानाचे आणि स्वराज्याचे प्रतीक आहे.
दरवर्षी १२ जानेवारी रोजी माँ जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मावळे, जिजाऊ ब्रिगेडच्या लेकी, युवक-युवती आणि नागरिक सिंदखेडराजात दाखल होतात.
मात्र, या प्रेरणा स्थळी पोहोचण्याचा मार्गच आज यातनामय झाला आहे.
दुसरबीड–सिंदखेडराजा रस्ता : विकासाचा काळा डाग
गेल्या अनेक वर्षांपासून दुसरबीड–सिंदखेडराजा हा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे.
▪️ एकाच बाजूने एकच वाहन जाऊ शकते
▪️ ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला
▪️ मोठमोठे जीवघेणे खड्डे
▪️ पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य
या रस्त्यावरून प्रवास करताना प्रेरणा घेण्यासाठी येणाऱ्या माँ जिजाऊंच्या लेकींना अपमान, त्रास आणि जीव धोक्यात घालावा लागत आहे.
प्रश्न गंभीर आहे – हे दुर्लक्ष मुद्दामून?
ज्या भूमीतून स्वराज्याची मशाल पेटली,
ज्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घडले,
त्याच भूमीवर आज मूलभूत सुविधांचा अभाव का?
➡️ सिंदखेडराजाचा विकास मुद्दाम दुर्लक्षित केला जातोय का?
➡️ राजमाता माँ जिजाऊंच्या नावावर फक्त भाषणे आणि फोटोपुरतेच राजकारण का?
➡️ बहुजनांच्या प्रेरणा स्थानाला विकासापासून वंचित ठेवण्यामागे राजकीय आकस आहे का?
सरकारला थेट सवाल
महाराष्ट्र सरकारने दरवर्षी जिजाऊ जयंतीला मोठमोठ्या घोषणा करायच्या, पण रस्ता दुरुस्तीसाठी निधी नाही, हे कोणते न्यायाचे गणित?
आज माँ जिजाऊंच्या लेकी स्वराज्याची मशाल जपण्यासाठी सिंदखेडराजाकडे जातात,
पण सरकार मात्र डोळेझाक करून बसले आहे.
तातडीची मागणी
▪️ दुसरबीड–सिंदखेडराजा रस्त्याचे तात्काळ काँक्रिटीकरण
▪️ रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती
▪️ सिंदखेडराजाला स्वतंत्र विकास आराखडा
अन्यथा हा प्रश्न केवळ रस्त्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर बहुजनांच्या स्वाभिमानाचा संघर्ष बनेल, असा इशारा आता उघडपणे दिला जात आहे.
