दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: शहरातील कै.सौ.शेषाबाई सी.मुंढे कला महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागांतर्गत आयोजित व्याख्यानात ‘सद्यस्थितीतील बँकिंग क्षेत्रातील बदल’ या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून अर्थशास्त्र विषयाचे तज्ज्ञ डॉ. श्रद्धानंद माने यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात डॉ.माने यांनी राष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या बदलत्या भूमिका, सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारा घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, बँकिंग क्षेत्रातील सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीस चालना मिळत असून, देशातील आर्थिक सुधारणा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरत आहे.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, डिजिटल बँकिंग, वित्तीय समावेशन, बँकांचे विलीनीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यामुळे बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल होत आहेत. सरकार आणि रिझर्व्ह बँक घेत असलेल्या धोरणात्मक निर्णयांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभागातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुभाष यादव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. तसेच डॉ.अहेरकर, प्रा.लटपटे, प्रा.टेकाळे, डॉ.फड, डॉ.सातपुते, डॉ.अवचित्ते यांचीही विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त ठरले. बँकिंग क्षेत्राच्या अद्ययावत स्थितीबद्दल त्यांना सखोल माहिती मिळाली. डिजिटलायझेशन, आर्थिक धोरणे आणि बँकिंग क्षेत्रातील नव्या संधी याबाबत त्यांनी विचारमंथन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी अर्थशास्त्र विभागाचे अभिनंदन केले.
