दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : महिला सक्षमीकरण,आरोग्य जागरूकता आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी ‘रन फॉर हर’ मॅरेथॉन यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण करत हॅट्रिक पूर्ण करत आहे. हेलिंग लाईव्हस यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही मॅरेथॉन १८ जानेवारी २०२६ रोजी रांजणगाव येथील राजमुद्रा चौक येथे उत्साहात पार पडणार आहे.
महिलांना आत्मविश्वास देणे, आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे आणि समाजात महिलांच्या सक्षम भूमिकेचा ठोस संदेश पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी हजारो महिला, युवक व कुटुंबीय या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असून ‘रन फॉर हर’ ही केवळ स्पर्धा न राहता एक व्यापक सामाजिक चळवळ बनली आहे.
या मॅरेथॉनची खास ओळख म्हणजे ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या महिला धावपटूंना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्याची परंपरा. पहिल्या वर्षी ऑलिम्पियन हिमा दास, दुसऱ्या वर्षी ऑलिम्पियन कविता राऊत, तर यंदा तिसऱ्या वर्षी ऑलिम्पियन ललिता बाबर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या मॅरेथॉनला विशेष आकर्षण ठरणार आहे कारगिल युद्धातील परमवीर चक्र सन्मानित योगेंद्र सिंग यादव यांची उपस्थिती. खऱ्या अर्थाने ‘रिअल लाईफ हिरो’ असलेल्या योगेंद्र यादव यांच्या शौर्यगाथेमुळे सहभागी धावपटूंना देशभक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाची प्रेरणा मिळणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाला वरद फाउंडेशनचा मोलाचा पाठिंबा लाभणार असून, सुजय पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
सर्व वयोगटांतील सहभागींसाठी ही मॅरेथॉन २.५ किलोमीटर व ५ किलोमीटर अशा दोन अंतरांमध्ये आयोजित करण्यात येणार असून, नवोदित धावपटू, महिला, युवक तसेच कुटुंबीयांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
ही मॅरेथॉन डॉ. जानी विश्वनाथ, संस्थापक – हेलिंग लाईव्हस, यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. महिलांना आत्मसन्मान, आरोग्य आणि समान संधींच्या दिशेने सक्षम करणे हे या उपक्रमामागील प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.‘रन फॉर हर’ ही केवळ धावण्याची शर्यत नसून, महिलांच्या ताकदीचा, जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे.
हेलिंग लाईव्हसतर्फे सर्व महिला, युवक, कुटुंबीय आणि फिटनेसप्रेमींना या ऐतिहासिक हॅट्रिक मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या प्रेरणादायी चळवळीचा भाग बना व महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्या.
– संतोष सांबारे,महाराष्ट्र झोन चिप, हिलिंग लाईव्हस संस्था.
