मोहोळ: तालुका ग्रा. प्र.(राज खरात)
आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती, ज्यांनी संत ज्ञानेश्वरानंतर जगाला पुन्हा एकदा विश्वबंधुत्वाची जाणीव करून दिली.
त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचीही जगाला ओळख करून दिली, त्या स्वामी विवेकानंदांची जयंती आज युवक दिन म्हणून साजरी केली जाते.
ज्यांनी आपल्या जाज्वल्य देशाभिमानाने आणि प्रखर विचारांनी तरुणाईच्या मनावर अधिराज्य केले, त्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी अर्थात युवक दिनी युवा मनाचा कानोसा घेतला असता त्यांच्या जाणिवा व आशा ; स्वप्ने व दिशा त्यांनी
हमारी मुठ्ठी मे है आकाश सारा या आवेशात दै. ‘चालू वार्ता’ शी
बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
अथर्व खरात (कोळेगाव ता. मोहोळ) राष्ट्राची शक्ती म्हणजेच युवाशक्ती, या युवाशक्तीला जागरूक करण्याची ताकद शिक्षण व्यवस्थेत असून शिक्षण व्यवस्था आश्वासक व सक्षम असली पाहिजे, तीच गोष्ट विवेकानंदांनी त्यांच्या विचारातून सिद्ध करून तरुणाईला नेहमीच प्रेरणा दिली आहे.
सृष्टी घोलप( सोलापूर)
स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की उठा, जागे व्हा ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका, त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन मी उच्च पदापर्यंत पोहोचून तरुणाईच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करेन.
राज मल्लाव (कोळेगाव ता. मोहोळ) विवेकानंदांच्या आचार व विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी आजची तरुणाई धडपडत आहे त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील आव्हाने पेलण्याची ताकद आजच्या युवक युवतीमध्ये आहे.
क्रांती वाघमोडे ( न. पिंपरी ता. मोहोळ) स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणाईसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलेले आहेत. ध्यान आणि योगा बद्दल ते नेहमी आग्रही होते. ध्यानाने माणूस समृद्ध होतो. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तरुणाईनं आरोग्यासाठी ध्यान आणि योगा कडे लक्ष दिले पाहिजे.
प्रफुल्ल वाघमारे (सोलापूर) रात्रीतच पहाट दडलेली असते, पहाटेमध्ये सकाळ दडलेली असते, त्याच प्रकारे विवेकानंदाच्या विचारात एक चिरंतन, शाश्वत, आशावादी क्रांती दडलेली आहे.
सुलक्षणा स्वामी (सोलापूर) युवाशक्तीचा वापर विधायक कामासाठी झाला तर त्या कामातून अनेक विवेकानंद तयार होण्यास मदत होईल ही आज काळाची गरज आहे आणि हे आव्हान आजची तरुणाई समर्थपणे नक्कीच पूर्ण करेल.
ॲड.आकाश कापूरे (कोळेगाव ता. मोहोळ)
मनाची कवाडे जेव्हा बंद असतात त्यावेळी विवेकानंदांच्या विचारांनी ती कवाडे आपोआप उघडतात आणि तेजोमय ज्ञानप्रकाश सभोवताली पसरतो.यासाठी विवेकानंद अभ्यासणे खूप गरजेचे आहे.
याबरोबरच प्रदीप बंडगर , आर्यन खरात, श्रेया सलगर , ज्ञानदा नरुटे, विश्वजीत बंडगर , दीक्षा कापुरे, गायत्री वाघमोडे, सईताई डोंगरे या मोहोळ तालुक्यातील तरुणाईने विवेकानंदा विषयी व युवा दिनाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
