दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि.६- मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविणे व मतदार जनजागृतीसाठी भारत निवडणूक आयेगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक साक्षरता मंडळाच्या कार्यशाळेचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, वर्शिप अर्थ फांऊडेशनचे संस्थापक पराग मते, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय व्यवस्थापक डी. कार्तीकेयन, शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, निवडणूक साक्षरता मंडळासाठी नेमण्यात आलेले समन्वयक अधिकारी व सदिच्छा दूत उपस्थित राहणार आहेत.
स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी शाळा व महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ व चुनाव पाठशाळा स्थापन करण्यात येतात. मतदार साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी निवडणूक साक्षरता मंडळाच्या माध्यमातून मतदार नोंदणी प्रक्रियेसंबंधितच्या अपेक्षित व्यक्तींना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यात येते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मताची किंमत समजावून देणे व त्यांचा मताधिकार आत्मविश्वासाने नितिमत्तापूर्ण व सुखदायक पद्धतीने वापर करण्यासाठी मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. या व्यासपीठातंर्गत निवडणूक, मतदान, लोकशाही या संदर्भातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांनी निवडणूक साक्षरता मंडळ प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील १५ शाळा व ४३ महाविद्यालयांची निवड केली आहे. या शाळा व महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यासंदर्भात वशिप अर्थ फाऊंडेशन या संस्थेमार्फत कामकाज करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रतिनिधी शाळा व महाविद्यालयांशी संपर्क साधणार असून यासाठी शाळा व महाविद्यालयामार्फत एका शिक्षकाची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी प्रतिनिधींची या प्रकल्पासाठी सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याद्वारे मंडळाअंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती मिळणार आहे.
