दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- मंगळवार ३ जानेवारी २०२३ रोजी अंजनगाव सुर्जी शहरात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त विविध महिला संघटनांच्या वतीने शहरातून भव्य बाईक रॅली यावेळी काढण्यात आली.या भव्य रॅलीची सुरुवात लोंढे कॉम्प्लेक्स तर सांगता सुर्जीतील सावता माळी मंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आले.
यावेळी महिलांनी सर्व क्षेत्रात सक्षम असल्याची खात्री समाजाला दिली आणि संपूर्ण उपस्थित महीला वर्गाने “दिशा अखंड गातात दाही नांदते,जेथे उत्कृष्ट लोकशाही,ज्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई,तेथे सुखी असणार माझी आई”,असा संदेश सुद्धा यावेळी महिलांनी समाजाला दिला.या कार्यक्रमाला सौ.नीताताई हाडोळे,सौ.मधुराताई लेंधे,सौ.वैशालीताई गावंडे,सौ.अपर्णाताई मालठाणे,सौ.प्रतिभाताई सातपुते,विद्याताई अरबट,सौ.अर्चनाताई पठाण,शुभांगी पाटणकर,सीमा हाडोळे,प्रिया गायगोले यांची उपस्थितीत सुर्जीतील द्वारका चौक येथील प्रशस्त प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनी व भगवे फेटे परिधान करून बाईक रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या महिलांनी सक्षम नारी शक्तीचा संदेश दिला आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांनी संपूर्ण शहरात जय ज्योती जय क्रांती या जयघोषाने जल्लोष साजरा केला.
