दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पालम : मागील काही कालावधीपासून परभणी शहर व अन्य तालुक्यातून चोरांनी मोठा उच्छाद मांडलेला दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी तर सोडाच परंतु दिवसा ढवळ्या सुध्दा परभणी शहरात चोरीच्या घटना घडल्या जात आहेत. त्याचेच दोन आता सभोवतालच्या तालुक्यात पोहोचले जात आहे. पालम तालुक्यातील सेलू येथे अज्ञात चोरट्यांनी एक जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर डल्ला मारुन तब्बल सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. ज्यामुळे नागरिक पूरते हैराण झाले आहेत तर पोलिसांची निंद हराम झाली आहे.
मोकींद शंकरराव गायकर व अन्य एकजणाच्या घराची कुलुपे तोडून अज्ञात चोरट्यांनी हा महाप्रताप केल्याचे समजते. पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत सोन्या-चांदीचे झाडीने, एक मोबाईल व रोख रुपये नव्वद हजारांची रोकड असा एकूण दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल लुटून पोबारा केल्याचे नमूद केले आहे.
घटनेची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास पालम पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक एस्.व्ही.भोसले हे करीत असल्याचे समजले.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी झालेल्या पर्जन्यवृष्टी मुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले होते. परिणामी हातात तोंडाशी आलेला घास वाया गेला होता. त्यानंतर पावसाने मारलेली दडी जमिनीवर त्राण व पिकांना जाळणारी ठरली. त्यामुळेही शेतकरी कमालीचा मेटाकुटीला येवून पूरता हत्तबल ठरला होता. तरीही जीवाचे रान व कुशाग्र अशी मेहनत करुन जेवढे काय करता येईल तेवढे पोटाला चिमटे घेऊन केले व त्यातूनच उपजवलेल्या धान्यापोटी जेवढे काही मिळाले होते. त्यातूनच साठवलेला पै-पैका व आधार होईल या काळजीने घरात सांभाळून ठेवलेल्या दागिन्यांवर व पैश्यांवर सुध्दा आता या चोरट्यांनी डल्ला मारुन शेतकऱ्यांना पूरते नागविले आहे. एका पाठोपाठ एक अशा समस्यांच्या चक्रव्युहात जखडले जाणाऱ्या शेतकरी राजाला नेमका आधार आणि धीर तरी कोण देणार हा खरा सवाल आहे.
चोरांच्या मुसक्या आवळून त्यांचे कंबरडेच मोडायचे असेल तर नागरिक व पोलीस यांच्या समन्वयातून गस्ती पथके तयार करुन रात्रीच्या वेळी तैनात ठेवणे व जागता पहारा देणे हाच एक पर्याय असू शकतो. पोलीस बळ कमी आणि जबाबदाऱ्या अनेक असल्याने निव्वळ पोलिसांवर अवलंबून राहून चालणार नाही.
