दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/केज —मध्ययुगीन कालखंडात असलेली जाती व्यवस्था, बोलीभाषा, कार्य विभागणी आणि वेशभुषा याचे हुबेहूब दर्शन घडवणाऱ्या लळीत नाट्याचे विडा (ता. केज ) येथे हनुमान जयंतीला सादरीकरण करण्याची परंपरा जपली आहे. येत्या शुक्रवारी ( दि. ७ ) मध्यरात्री १ वाजेपासून नाट्याचे सादरीकरण होणार असल्याने कलाकारांनी जोरदार तयारी सुरू केली असून हे नाट्य रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. लोकरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची दिशा दाखवणारे लळीत नाट्याची महाराष्ट्रात प्रथम सुरुवात स्वामी रामानंद यांनी केली होती. सुरुवातीला अनेक ठिकाणी सादर होणारे लळीत आता काही मोजक्याच ठिकाणी यात्रा आणि उत्सवामधून सादर केले जाते. लळिताच्या नाट्य संहितेलाबाड म्हटले जाते. तर विडा येथील तत्कालीन नाट्य कलावंत धोंडीराम शास्त्री कोकीळ यांनी जालना जिल्ह्यात सादर होणाऱ्या लळीत कार्यक्रमाला भेट देऊन त्याच्या अवलोकनानंतर तेथेच हस्तलिखीत बाड तयार केले. प्रथम ते हनुमान जन्मोत्सवात सादर केले गेले. पुढे गावकऱ्यांनी ती परंपरा आजही टिकवून ठेवली आहे. तर ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी विडेकरांनी एक लळीत मंडळ स्थापन केले. लळीत नाट्यामुळे मध्ययुगीन कालखंडातील जाती व्यवस्था, बोलीभाषा, कार्य विभागणी आणि वेशभुषा आदी गोष्टी सोंगाच्या माध्यमातून दाखविल्या जातात. ब्राह्मण, फकीर, तुंबडीवाले, बहुरूपी, राजा, भाट, आराधी, गोंधळी, छडीदार, चोपदार, वाघ्या, मुरूळी अशी सोंग घेऊन लळीत नाट्य सादर केले जात आहे. नाट्याच्या माध्यमातून एकोपा आणि सामाजिक एकात्मिक दर्शन घडते.
वृद्ध कलाकारांसह युवकांचाही नाट्यमहोत्सवात असतो सहभाग
नाट्यात वृध्द कलाकारांपासून ते युवक ही सहभाग नोंदवणार असून शिवाजी भुजबळ, रंगनाथ पटाईत, जगन्नाथ सुतार, शाम राव पटाईत, बापूराव देशमुख, संदिप भुजबळ, जोतीराम (राजाभाऊ) घोरपडे, गोविंद देशमुख, शंकर देशमुख, विनोद घंटे शशिकांत विडेकर, दत्ता पटाईत, शहाजी घूटे, सचिन भुजबळ, राजा कुलकर्णी, आच्युत भालेकर, विलास गुरव, हरी कुलकर्णी, भीमा कदम, ढोलकी वादक राजाभाऊ देशमुख, राम लिंग कुंभार, मारुती अप्पा घुटे, एकनाथ पटाईत या कलाकारांनी हनुमान जयंती तोंडावर आल्याने नाट्य महोत्सवाची जोरदार तयारी केली आहे.
