स्वच्छतेचे निकष धाब्यावर अन्न व औषध विभाग मात्र कोमात…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नादेड(देगलूर); देगलूर शहरातील विविध भागातील हॉटेलसह
रस्त्यांवर विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या
गाड्यांवर उघडे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री
केले जात आहेत या खाद्यपदार्थांना वापरणारा तेल पुन्हा पुन्हा तेच तेल वापरून खाद्यपदार्थ बनवले जातात या पदार्थांमध्ये चव येण्यासाठी टेस्टिंग पावडरचा भरपूर प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य
धोक्यात आले आहे.
या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह असून अन्न व औषध विभागासह महापालिका आणि इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. अन्न व औषध विभागाचे अधिकारी विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
देगलूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याबरोबरच व्यावसायीक प्रतिष्ठानांचीही संख्या वाढत आहे. शहरात छोटी हॉटेल, भेल भंडार, शीतपेयाच्या गाड्यांसह पाणीपुरी, वडापाव, चायनीज विक्री करणाऱ्या हातगाड्यांनी सर्व प्रमुख रस्ते अतिक्रमित केले आहेत. देगलूर शहरात
जुना बस स्थानक व नवीन बस स्थानक व मुख्य रस्त्यावर चौकाचौकात सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या संख्येने थाटली जातात. मात्र, यातील बहुतांश हॉटेल्स व गाड्यांवर परवान्याविनाच खाद्य पदार्थांची विक्री सुरु असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी परवाना नुतनीकरण न करताच हा व्यवसाय सुरु ठेवला असल्याचेही आढळून आले आहे. खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असतो. त्यामुळे खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक निकषाची पूर्तता करावी लागते. मात्र, या भानगडीत रस्त्यावर खाद्यविक्री करणारे पडताना दिसत नाहीत. त्यातच आता पावसाळा सुरू झाला असून रोगराई पसरण्याची भीती आहेच. परवाना नुतनीकरणाकडे दुर्लक्ष.
छोट्या हॉटेलमधून खाद्यपदार्थांची विक्री केली
जाते, अशा हॉटेल्समध्ये स्वच्छतेची काळजी
घेतली जाते की नाही, हे तपासून संबंधितांकडून
प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर अन्न व औषध
प्रशासनाकडून काही अटींची पूर्तता केल्यानंतर
त्यांना परवाना दिला जातो.
एवढे सर्व करूनही खाद्य परवानाही या पदार्थ विक्री धारकांना घ्यावा लागतो. हे परवाने दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागतात. मात्र, शहरातील अनेक छोटे हॉटेल्स धारकांनी परवाना नूतनीकरण केले नसल्याची माहिती समोर आली आहे. अधिकारी मात्र आपल्या एयर कंडीशन ऑफिसमध्ये बसून दिवसा काढताना दिसत आहेत मात्र शहरातील जनतेचे आरोग्य राम भरोसे आहे का? असा कुठेतरी प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होताना दिसत आहे. तरी या विषयाकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून शहरातील अशा हॉटेल्स व हातगाड्यांवर कारवाई करून देगलूर शहरातील नागरिकांचे आरोग्य कसे निरोगी राहील याकडे लक्ष दिले पाहिजे.
