राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे.
स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या आता मुक्त करण्यात आल्या आहेत.
अजली दमानिया काय म्हणाल्या?
अंजली दमानिया यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. बेनामी संपत्ती प्रकरणात अजित पवारांना क्लीन चीट मिळाल्याप्रकरणी अंजली दमानिया म्हणतात, “शाब्बास! १००० कोटी? भाजपला पाठिंबा द्या, उपमुख्यमंत्रिपद घ्या आणि जप्त केलेली अफाट संपत्ती पुन्हा खिशात?” अशी पोस्ट दमानिया यांनी X वर केली आहे.
अजित पवार यांना दिल्लीच्या न्यायाधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे. २०२१ च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्ता शुक्रवारी मुक्त करण्यात आल्या. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय दिला. न्यायाधिकरणाने त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेनामी मालमत्तेच्या मालकीचे आरोपसुद्धा फेटाळून लावले आहेत.
नेमकं प्रकरण तरी काय..?
७ सप्टेंबर २०२१ रोजी, आयकर विभागाने अजित पवारांच्या वेगवेगळ्या कंपन्यांवर छापे टाकले होते. ज्यामध्ये काही मालमत्ता अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप करणारी काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. दिल्लीस्थित बेनामी अपिलीय न्यायाधिकरणाने हे आरोप फेटाळले. या नकाराच्या विरोधातील अपिलही बेनामी न्यायाधिकरणाने ५ नोव्हेंबर २०२४ रोजी फेटाळले.
