केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार राजाभाऊ वाजे यांनी भेट घेत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पत्रव्यवहार केला. या वेळी नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
दरम्यान, रेडिओ दुर्बिणीमुळे ९० किलोमीटरपर्यंत रेल्वेचे अंतर वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पात अडथळे निर्माण झाल्याने अडथळे दूर करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार वाजे यांनी शुक्रवारी (ता. ६) दिल्लीत भेट घेतली. रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने होणार असल्याचे सांगण्यात आले. महारेलच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या आराखड्यात (डीपीआर) नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे चालविली जाणारी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ दुर्बीण) या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रकल्पातून रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.
मात्र, ही बाब रेल्वे मंत्रालयाला लक्षात येताच त्याबाबत आता नव्याने आराखडा बनविण्याच्या कामाला मान्यता देण्यात आली. नारायणगाव येथील जीएमआरटी प्रकल्पाला वळसा घालून नव्याने रेल्वेमार्गाचा डीपीआर बनविला जात आहे. नवा डीपीआर अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी खासदार वाजे यांना दिली.
रेल्वेचे अंतर वाढणार
महारेलने बनविलेल्या डीपीआरमध्ये नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’मधून रेल्वेमार्ग प्रस्तावित होता; परंतु नव्याने तयार होत असलेल्या डीपीआरमध्ये जीएमआरटीला वळसा दिला जाणार आहे. यामुळे किमान ६० ते ९० किलोमीटर अंतर वाढून अर्ध्या तासाचा वेळ वाढणार आहे.
”नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाचा नव्याने तयार होत असलेला डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तांत्रिक बाबी पूर्ण होऊन अंतिम मंजुरी मिळेल.”-राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
