नाव ऐकूनच बँकेने बोलावले पोलीस, बँक बॅलेन्स पाहिलं तेव्हा…
जुने आणि फाटके कपडे घालून एक व्यक्ती मध्य प्रदेशच्या भोपाळमधील कोलार येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत पोहोचली. त्याने बँक कर्मचाऱ्याला आपलं बँक अकाऊंटव बंद करण्याची विनंती केली.
त्या व्यक्तीने आपलं बँक खात्याबाबत माहिती देताच संपूर्ण बँकेत एकच खळबळ उडाली. बँकेने तातडीने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी बँक खात्याचं तपशील पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. राहुल श्रीवास्तव नावाची ही व्यक्ती.
राहुल श्रीवास्तव बँक अकाऊंट बंद करण्यासाठी फाटलेले कपडे घालून तो बँकेत पोहोचला. त्याच्या 2 खात्यांमध्ये 3 महिन्यांत 3 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी खातेदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. राहुल श्रीवास्तवनं एका दाम्पत्यासह खातं विकल्याचं सांगताच पोलीस चक्रावून गेले. या बदल्यात आपल्याला कमिशन मिळत असल्याचं त्यानं सांगितलं.
अतिरिक्त डीसीपी मलकित सिंह यांनी सांगितलं, 19 डिसेंबर रोजी कोलार पोलिसांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या मंदाकिनी कोलार रोड शाखेतून एक ईमेल आला. ज्यामध्ये राहुल श्रीवास्तव बँक खातं बंद करण्यासाठी आल्याचं सांगण्यात आलं. गेल्या 2-3 महिन्यांत राहुलच्या 2 बँक खात्यांमध्ये सुमारे 3 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचंही ईमेलमध्ये सांगण्यात आलं. माहिती मिळताच पोलीस बँकेत पोहोचले. 3 ऑक्टोबर 2024 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत 3 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं बँक खात्याच्या तपशिलातून समोर आलं आहे.
पोलिसांनी राहुल श्रीवास्तवची चौकशी केली. त्याने केलकच्छ उदयपुरा रायसेन येथील घनश्याम सिंगरोलेला दोन खाती 45 हजार रुपयांना विकल्याचं पोलिसांना सांगितलं. एक खातं त्याचं आणि दुसरं त्याच्या पत्नीचं खातं. घनश्यामनेच आपल्याला खाते विकण्याची आयडिया दिल्याचं तो म्हणाला. घनश्यामने त्याची बागसेनिया परिसरात राहणारे लिव्ह-इन पार्टनर निकिता प्रजापती आणि नितेश प्रजापती यांच्याशी ओळख करून दिली होती.’
पोलिसांनी मुख्य आरोपी, त्याची पत्नी आणि लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या कपलला अटक केली आहे. लिव्ह इनमध्ये राहणारं कपल बागवेनिया परिसरात आधारकार्ड, पॅनकार्ड, फूड लायसन्स बनवण्याचं काम करायचं. लिव्ह-इन पार्टनरने शेकडो खाती फसव्या पद्धतीने उघडून विकल्याचं तपासात उघड झालं. खाती उघडण्याचं आमिष दाखवून मजूर आणि गरीब वर्गातील लोकांची कागदपत्रं मिळविली. खातं उघडल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली. या कपलने 200 हून अधिक खाती विकल्याचं कबूल केलं.
भोपाळच्या कोलार पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या, खाती विकणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचा सूत्रधार हा केवळ सातवी पास आहे. आरोपींकडून 3 कार्ड स्वाइप मशीन, 6 मोबाईल फोन, 34 क्रेडिट डेबिट कार्ड, 20 चेक, 24 चेकबुक, 6 पास बुक, 77 सिमकार्ड, 2 डायरी, 12 एटीएम, 1 लॅपटॉप, 2 वाय-फाय राउटर जप्त करण्यात आले आहेत. 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
