बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने जिल्हाच नव्हे तर सगळं राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत
या प्रकरणातील सगळे आरोपी आणि मास्टरमाईंड अटकेत नसल्याचे संताप व्यक्त केला जात आहे. तर, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांच्या एका ट्वीटने आणखी वातावरण आणखीच तापणार असल्याची चर्चा आहे.
देशमुख प्रकरणातील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे…
केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तिन्ही गुन्हे आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातून बीड पोलिसांचा रोल संपला आहे, असे असले तरी मुख्य आरोपी अद्याप मोकाटच असल्याने संताप व्यक्त आहे.
अंजली दमानिया आक्रमक…
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी मागील काही दिवसांपासून बीडच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, संतोष देशमुख प्रकरणात भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन का बाळगले असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला.
दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून पिस्तुलीचा होत असलेल्या गैरप्रकारावर ट्वीट करत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
अंजली दमानियांचे ट्वीट काय?
अंजली दमानिया यांनी ट्वीट करत वाल्मिक कराडसह चार आमदारांची नावे घेतली आहे. दमनिया यांनी म्हटले की, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला छळून जमिनी बळकावल्या असतील, खंडणी मागितली असेल किंवा कार्यकर्ते बंदूक दाखवून दहशत पसरवत असतील तर आमच्या 9235353500 ह्या नंबर वर कळवण्याचे आवाहन केले आहे. सगळी माहिती आणि माहिती देणाऱ्याचे नावे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येतील असेही दमानिया यांनी म्हटले.
