एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा सतीश वाघ हत्याकांड प्रकरणात खुलासा झाला आहे. सतीश वाघ यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं आणि अपहरण झाल्यानंतर अवघ्या 37 किमी अंतरावर वाघ यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी त्यांची बायको मोहिनी वाघ यांनीच सुपारी देऊन वाघ यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पण वाघ यांना इतक्या निर्घृणपणे का मारण्यात आलं, नेमक्या कोणत्या गोष्टीचा सूड उगवला, याबाबत मोठा खुलासा पोलिसांनी केला आहे.
याबाबतची अधिक माहिती सांगताना पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितलं की, सतीश वाघ प्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना वाघ यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणारा अक्षय जावळकर आणि पत्नी मोहिनी वाघ यांनीच हा हत्येचा कट रचला होता. तर इतर चौघांनी वाघ यांची प्रत्यक्षात हत्या केली होती.
अक्षय आणि मोहिनी वाघ यांचे अनैतिक प्रेमसंबध होते. दोघांच्या प्रेमात सतीश वाघ अडसर ठरत होते. शिवाय सतीश वाघ हे दारुची नशा करून सतत मोहिनी वाघ हिला मारहाण करायचे. त्यामुळे मोहिनीने अक्षयला हाताशी धरून सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला. तसेच तिला वाघ यांचे सगळे पैशांचे व्यवहार आपल्या हाती घ्यायचे होते. यातूनच मोहिनी वाघने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी पाच लाखांची सुपारी अक्षय जावळकरला दिली. तसेच हत्या कशी करायची, यासाठी १५ दिवसांपासून कट रचला जात असल्याची माहिती देखील पोलीस तपासातून पुढे आली आहे.
कसं झालं अपहरण?
9 डिसेंबरच्या पहाटे शेवाळवाडीत सतीश वाघ हे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जाताच दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चार चाकी गाडीत बसवलं आणि अपहरण करून घेऊन गेले. अपहरणानंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. साधारण साडे आठ वाजता हा तपास सुरू झाला होता, अशी माहिती मिळाली. गुन्हे शाखेला सकाळी 9 वाजता टीम रवाना करण्याचे आदेश देण्यात आले होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या 12 टीमने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास सुरू 12 वाजता झाला. त्यानंतर तीन वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.
वाघ यांना 72 वेळा भोसकलं आणि प्रायव्हेट पार्ट कापला
शोध सुरू असताना सहा वाजेच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर आठ वाजेच्या सुमारास आयकार आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळला होता. सतीश वाघ यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ७२ वेळा त्यांना चाकूने भोसकलं होतं. एवढंच नाहीतर मारेकऱ्यांनी वाघ यांचा प्रायव्हेट पार्ट सुद्धा कापण्यात आला होता. अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात आतापर्यंत कुणा-कुणाला अटक?
सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना २५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
पवनकुमार शर्मा, विकास शिंदे आणि अक्षय जवळकर या तिघांना पुणे पोलिसांनी आधीच अटक केली होती. तर धाराशिवमधून 24 डिसेंबरला अतिश जाधवला अटक केली होती. त्यानंतर प्रकरणाला वळण मिळालं. अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांचा शेजारीच आहे.
