दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : दोन दिवसापूर्वी वाघोलीत एक काळिमा फासणारी घटना घडली. इयत्ता ४ च्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला खाउचे आमिष दाखवत तिला फसवून त्या नराधमाने लैंगिक अत्याचार केला. खरे पाहता एवढ्या लहान वयात एकट्या मुलीला शाळेत पाठवणे पालकांना किती प्रमाणात योग्य वाटले असावे. कुणी सोबत असते तर या नराधमाला असा डाव साधता आला नसता. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की रस्त्याने जा ये करणाऱ्या नागरिकांची सजगता कमी पडत आहे जो तो फक्त आपल्या कामाच्या व्यापात गुंग आहे. आजूबाजूच्या गोष्टीशी त्यांना कुठलेही सोयर सुतक नाही असे जाणवते. नागरिकांनी रस्त्याने येता जाता आपल्या आजूबाजूला काय घडतंय यासाठी सजग राहण्याची गरज आहे, जेणेकरून अशा नराधमांना वेळीच ठेचून काढता येईल. नागरिकांनी सहकार्याची भावना दाखवली तर नक्कीच पोलिसांवर येणारा ताण नक्कीच कमी होणार आहे.
सोशल मीडिया ठरतेय कारणीभूत…
महिला व मुलींवर अत्याचार होण्यात बऱ्याच प्रमाणात सोशल मीडिया जबाबदार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा व मुलगी जवळ येतात. याची भनक पालकांना लागत नाही. अल्पवयीन मुलींना फारशी समज राहत नसल्याने त्या मुलांकडून टाकण्यात आलेल्या बनावट प्रेमाच्या पाशात अडकतात. त्यानंतर प्रेमाच्या आड शारीरिक शोषण केले जाते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना आठ दिवसांतून एकदा घडते. काही पालक तर पोलिसात तक्रार देण्यासही जात नसल्याचे दिसून आले आहे. यातून या प्रकारांना आणखीच बळ मिळत असल्याचे दिसते.
हल्ली पालकांकडून दुर्लक्ष होतय मुलांकडे…
वेळीच सावध व्हा पालक वर्ग ..
मुल- मुली शाळेत ,कॉलेज मधे जात नसुन हल्ली आई-वडीलांची फसवणूक करत आहे .शाळा कॉलेजला जाण्याचे ते बहाणे करून बाहेर उनाड मित्र-मैत्रिणी सोबत फिरत असतात.पालकांना वाटत की आपली मुलं शाळा कॉलेजला गेली आहेत.
सध्याची परिस्थिती पाहता. तरुण-तरुणी वर्ग वाईट सवयींना बळी पडत आहे.कुठेही टपरीवर मुली सिगारेटचा धूर सोडताना दिसून येत आहे.त्यांना पालकांनी वेळीच आवरलं पाहिजे.
मुलांना उपदेश करण्याची पद्धत बदला
मुलांना एखादी गोष्ट वारंवार सांगितल्याने ते भडकत असतील तर तुमची सांगण्याची पद्धत बदला. त्यांना तीच गोष्ट नव्याने सांगण्याचा प्रयत्न करा.
संतप्त प्रतिक्रिया देणे टाळा
काही पालक मुलाने उलट उत्तर दिले तर त्यांचा अहंकार दुखवतो. मी माझ्या आईवडिलांना कधी उलट उत्तर दिले नाही आणि हा मला कसा काय देतो? असे त्यांना वाटते. आणि त्यामुळे त्यांचा आवाज चढतो, ज्यामुळे वाद वाढतो.
मुलांना समजून घ्या..
तुमच्या मुलांच्या आक्रमक स्वभावाला तुम्हालाच आवर घालायचा आहे. त्यामुळे स्वतः आपला संयम ढासळून देऊ नका. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही काय वेगळे करता ते पहा.
गुड टच, बॅड टचची माहिती मुलींना द्यावी
नात्यातील लोकच अत्याचार, छेडछाड करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे असे असले, तरी सर्वच सारखे असतात, असे नाही. अशा काळिमा फासणाऱ्या घटना टाळण्यासाठी घरातील ज्येष्ठांनी महिला, मुलींशी संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्यावर लक्ष ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. येथे संस्काराचा भागही महत्त्वाचा ठरतो. आपले थोडेसे दुर्लक्ष मुलगी अथवा महिलेचे आयुष्य खराब करते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. गुड टच, बॅड टचची माहिती मुलींना द्यावी.
– डॉ. पल्लवी मेहरे, वाघोली, पुणे.
पालकांनी विशेष लक्ष द्यावे
महिला, मुलींना त्रास होत असल्यास तातडीने पोलिसांची मदत घ्यावी. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. लहान मुलींसोबत नेहमी संवाद ठेवावा. ठराविक वयात आल्यानंतर मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही लोक त्यांच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन अत्याचार अथवा छेडछाड करतात. बालविवाह लावणे हा देखील गुन्हा आहे. पालकांनी विशेष लक्ष द्यावे. काही तक्रार असल्यास भेटावे.
– राहुल करपे, उद्योजक, सणसवाडी.
११२ वर लगेच कॉल करा
महिला, मुलीची तक्रार आली की प्राधान्याने घेतली जाते. तपासात जे निष्पन्न होईल, त्याप्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले जाते. जवळपास घटनांमध्ये ओळखीचेच आरोपी असतात. मानसिकता बदलल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. तसेच पहिल्यांदा एखाद्याने थोडा त्रास दिला तर त्यावर लगेच आवाज उठविणे आवश्यक आहे. महिला, मुलींसह सामान्य नागरिक डायल ११२ वरून कधीही मदत घेऊ शकता.
– सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक, चंदननगर, पुणे.
