दौंड ते पुणे दरम्यान धावणाऱ्या शटल रेल्वेला सोमवारी सकाळी आग लागली. या आगीमुळे डब्यामध्ये धुराचे लोट पसरले. परिणामी प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सकाळी 7 वाजता ही रेल्वे दौंडमधून पुण्याकडे धावते. या रेल्वेमध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे यातील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तर आज घडलेल्या घटनेमुळे अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका व्यक्तीला रेल्वेमधील लोकांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न करून त्याला वाचवले. कारण, तो व्यक्ती ज्या ठिकाणी आग लागली होती, त्याच ठिकाणी टॉयलेटमध्ये अडकला होता.
इंजिनपासून तिसऱ्या डब्ब्यात लागली आग
मिळालेल्या माहितीनुसार इंजिनापासून तिसऱ्या डब्याला ही आग लागली होती. यामध्ये एक वयोवृद्ध प्रवासी अडकले होते. मात्र सहप्रवाशांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डेमो ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ही आग लागली. यावेळी एक प्रवासी आत होता. दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता.
काही वेळातच टॉयलेट मधून धूर बाहेर येऊ लागला आणि आत मधील व्यक्तीने आरडा-ओरड केली. हे लक्षात येताच काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत दरवाजाकडे धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.
तातडीने स्टेशन मास्तरला दिली माहिती!
या घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून ही बाब गंभीर आहे. अशा आगीच्या घटना थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
