बच्चू कडूंनी मंत्री विखेंना धू-धू धुतले !
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत आहे. पण, तिथं देखील ते शांत नाहीत. आंदोलनावेळी ज्यांनी-ज्यांनी टीका केली होती, त्याला सडेतोड उत्तर देण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे.
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टिकेला बच्चू कडू यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सुनावलं आहे. हे सुनावताना त्यांनी मंत्री विखे पाटलांच्या दुखत्या नसांवर बोट ठेवलं आहे. याच आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी बच्चू कडू यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला होता.
भाजप(BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीला बच्चू कडू यांच्या आंदोलनावर टीका केली होती. या टिकेला सुरुवातीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्त्यांनी प्रत्युत्तर दिले. आता यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना, मंत्री विखे पाटील यांना चांगलेच धू-धू धुतले. शेतकऱ्यांच्या वापरलेल्या कर्जापासून ते भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या मुद्यापर्यंत सर्वच काढलं.
बच्चू कडू म्हणाले, प्रहारच्या प्रवक्त्यांनी केलेली टीका असेल, त्यांच्याकडे काहीतरी माहिती उपलब्ध असेल. त्यांनाच विचारले तर अधिक माहिती होईल. न्यायालयाच्या आदेशानुसार मंत्री विखे पाटलांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पण दबावामुळे त्यांना अटक होत नाही. कारवाई होत नाही. नऊ कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्यांचे नावानं कर्ज घेऊन स्वतःच वापरलं. यासंदर्भात न्यायालयाने सुनावलं आहे.
बच्चू कडूंनी प्रवरा कारखान्याच्या ऊसाच्या भावावर हल्लाबोल चढवला. म्हणाले, “मंत्री विखे पाटलांना स्वतःच्या प्रवरा साखर कारखान्यामध्ये 3400 रुपये भाव असताना, 3000 रुपयापर्यंत देऊ शकत नाही. लाभक्षेत्राच्या बाहेरच्यांना कमी टनाने भाव देणारे मंत्री विखे पाटील, शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आणि कुणी करतं, तर त्यांना करू द्यायचं नाही, अशी त्यांची नीती आहे. मंत्री विखेंविषयी अधिक काय बोलायचं.
एवढी माहिती आहे की, त्यात विखे बुजून जातील
बच्चू कडू यांचा पराभव झाला असून, त्यांना त्याचे शल्य आहे. त्यांनी पराभवातून बाहेर येत लोकाभिमुख कामं करावीत, अशी मंत्री विखे पाटलांनी टीका केली होती. त्यावर बच्चू कडू यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आम्हाला सांगावे एवढे ते काही मोठे नाही. पराभवच्या आगोदर आमच्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. त्यांना माहिती नसेल, तर माहिती पाठवतो. आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाची एवढी माहिती अन् अध्यादेश आहेत की, ती पाठवली तर मंत्री विखे पाटील त्यात बुजून जातील, असा टोला लगावला.
भिकारी नसतानाही चार जण मारले
मंत्री विखे पाटील हा मोठा माणूस आहे. त्यांनी अगोदर माहिती घेऊन बोलावं. दोन-दोन, तीन-तीन पक्ष बदलणारे विखे, त्यांना सामान्य माणसांच्या काय व्यथा कळणार. त्यांच्या शिर्डीत भिकारी नसताना, चार जणांना मारले गेले. त्यांनी साधं घरी जाण्याचं औचित्य देखील दाखवलं नाही. अशांना बोलायचा काय अधिकार आहे, असा सवाल देखील बच्चू कडू यांनी केला.
