राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पायाशी ठेवतात आणि मी डॉ. बाबासाहेबांना आपल्या हृदयात ठेवतो, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
बिहारमधील जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सिवान जिल्ह्यातील जसौलीमध्ये त्यांची सभा झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासोबत त्यांनी रोड शो केला. त्यानंतर सभा घेतली. बिहार समृद्ध झाला तर भारत महाशक्ती होईल, असं मोदींनी व्यासपीठावरून ठामपणे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३५ मिनिटांच्या भाषणात आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. आरजेडी आणि काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोपही मोदींनी केला. अजूनही बिहारसाठी खूप काही करायचं आहे. गेल्या १० वर्षांत रस्त्यांचे जाळे विणले. दीड कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचलं. बिहारच्या शहरांमध्ये नव्याने स्टार्टअप सुरू होत आहेत, असं ते म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे :
गरीबी हटाओच्या घोषणा दशकांपासून ऐकत आहोत. दोन-दोन, तीन-तीन पिढ्या निवडणुकांमध्ये गरीबी हटाओ अशा घोषणा देतात. पण एनडीए सरकारनं दाखवून दिलं की गरीबी कमी होऊ शकते.
गेल्या दशकभरात २५ कोटी भारतीयांनी गरिबीला पराभूत केलं. वर्ल्ड बँकेसारख्या अनेक जागतिक संस्थांनी भारताचं कौतुक केलं. त्यात बिहार आणि येथील नितीश सरकारचं मोठं योगदान आहे. यापूर्वी बिहारचे अर्ध्याहून अधिक लोक गरीब होते. मात्र, गेल्या १० वर्षांत बिहारच्या जनतेनं स्वतःला गरिबीतून मुक्त केलं.
बिहारच्या लोकांनी जंगलराज संपवून टाकलं. इथल्या तरुणांनी २० वर्षांपूर्वीच्या बिहारची अवस्था किस्से आणि गोष्टींमधून ऐकली होती. जंगलराज करणाऱ्यांनी बिहारची काय अवस्था केली होती याचा त्यांना अंदाज नव्हता.
आरजेडीच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसोबत कसं वर्तन केलं हे सगळ्यांनी बघितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागा, असे बॅनर बिहारमध्ये लागले आहेत. हे लोक कधीच माफी मागणार नाहीत. कारण यांच्या मनात दलित, मागासवर्गीयांबद्दल आदर नाही. आरजेडी आणि काँग्रेसने आंबेडकरांचे फोटो पायाशी ठेवले, पण मोदी बाबासाहेबांना हृदयात ठेवतात.
