दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘अमेझॉन वेब सर्विसेस’ तर्फे ‘टेक अलायन्स क्लाउड चॅम्पियन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे. स्किल्स टू जॉब्स अँड टेक अलायन्स इंडिया चे प्रमुख मा. डी. पी. सिंग यांच्या हस्ते दिला गेलेला हा पुरस्कार महाविद्यालयाच्या तांत्रिक शिक्षणातील भरीव योगदानाची राष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल आहे.
प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने क्लाउड कम्प्युटिंग या अत्याधुनिक क्षेत्रात विद्यार्थिनींसाठी नव्या संधी निर्माण केल्या आहेत. सन २०१९ पासून अमेझॉन वेब सर्विसेससोबत भागीदारी करून महाविद्यालयाने क्लाउड कॉम्पिटिंग अभ्यासक्रम, प्रमाणपत्र प्रशिक्षण व उद्योग अनुभवावर आधारित शिक्षण यामार्फत आधुनिक कौशल्ये विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवली आहेत. या प्रक्रियेत डॉ. सोनाली कदम यांनी महाविद्यालय समन्वयक म्हणून काम पाहिले. टेक अलायन्स उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी स्किल मॅप अभ्यासक्रम तसेच हॅकाथॉनसारख्या उपक्रमांमध्ये भाग घेऊन आपली कौशल्ये सिद्ध केली आहेत. प्रशिक्षणानंतर मिळालेल्या नोकऱ्या, प्रमाणपत्रांमधील यश व उद्योग क्षेत्रातील स्वीकार हे या उपक्रमाच्या यशाचे परिणाम आहेत.
या गौरवाबद्दल अमेझॉन वेब सर्विसेसने महाविद्यालयाचे कौतुक करताना सांगितले की संस्थेने क्लाउड क्षेत्रात काम करण्यास सज्ज असा कार्यबल घडवला असून तांत्रिक शिक्षणाचे नवे मानदंड निश्चित केले आहेत. या यशामागे भारती विद्यापीठाचे सततचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे. मा. डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व मा. प्रा. डॉ. शिवाजीराव कदम कुलपती, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे यांची शैक्षणिक तत्त्वनिष्ठा संस्थेस दिशादर्शक ठरली आहे. तसेच मा. डॉ. अस्मिता जगताप कार्यकारी संचालिका आणि मा. सौ. विजयमाला कदम अध्यक्षा शालेय शिक्षण समिती यांचे महिला शिक्षणावरील दृढ विश्वास व प्रेरणा महत्त्वपूर्ण ठरली आहे. मा. डॉ. के. डी. जाधव सहकार्यवाह यांचे प्रशासकीय मार्गदर्शनही फार मोलाचे ठरले आहे.
